Rohit Sharma Virat Kohli MS Dhoni Shah Rukh Khan : सध्या IPLचा १५ हंगाम भारतात दणक्यात सुरू आहे. भारतीय संघातील तीन मोठे स्टार म्हणजेच, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा तिघेही स्पर्धेत सहभागी आहेत. पण तिघांनी अद्याप फारशी चमक दाखवता आलेली नाही. यासह दोन वेळा IPL विजेतेपद जिंकलेला शाहरूख खानचा KKR संघही काहीसा पिछाडीवर आहे. त्यामुळे हे चारही जण फारसे खुश नाहीत. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या चौघांसमवेत एकूण सहा जणांविरोधात इंदोरच्या हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. विनोद द्विवेदी नावाच्या एका वकिलाने ही जनहित याचिका दाखल केली आहे.
हे प्रसिद्ध सेलिब्रिटी जनतेला ऑनलाईन जुगार आणि सट्टा खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. विनोद द्विवेदी हे स्वत: वकिल आहेत. त्यांनी सद्यस्थिती लक्षात घेत ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी असं नमूद केलं आहे की, देशातील अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन खेळांवर बंधने आहेत. पण मध्यप्रदेश मध्ये अशी कोणतीही बंधन ठेवण्यात आलेली नाहीत.
याचिकेत आरोप केला आहे की, शाहरूख खान, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारखे प्रसिद्ध सेलिब्रिटी हे जनतेचे आणि युवा पिढीचे आदर्श असतात. त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न तरूणाई करत असते. पण लाखो युवकांचे आदर्श असलेले हे लोक सट्टा आणि ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी युवा पिढीला प्रोत्साहित करत आहेत. केवळ इतकंच नाही तर, ऑनलाईन सट्टा खेळून पैसे कसे कमवायचे हे जाहिरातीच्या माध्यमातून हे लोक युवा पिढीला सांगत आहेत. त्यामुळे याच्या नादी लागून कित्येक युवा आपलं आर्थिक नुकसान करत आहेत. तसेच, पैसे गमावल्यानंतर आत्महत्येचं पाऊलदेखील काहींनी उचललं आहे. त्यामुळे या जाहिराती आणि गेम्सवर बंदी घातली जायला हवी.
Web Title: rohit sharma virat kohli shahrukh khan ms dhoni petition filed in madhya pradesh know more details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.