भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्तीण काहीतरी खायला मिळेल या आशेनं केरळ येथील मलाप्पूरम येथील एका वसाहतीत गेली. पण, स्थानिकांनी तिला अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, रोहित शर्मा यांच्यासह क्रीडा विश्वातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.
निर्दयी मनुष्य; गर्भवती हत्तीची निर्घृण हत्या; भुकेनं व्याकुळ भटकत होती वणवण
आपण रानटी आहोत. अजूनही आपण काहीच शिकलेलो नाही का? केरळमध्ये गर्भवती हत्तीणीसोबत जे घडले ते ऐकून मन हादरून गेले. कोणत्याही प्राण्याला इतकी निर्दयी वागणूक मिळायला नको, असे रोहित शर्मा म्हणाला.
माणसांचे अजून एक लाजीरवाणे कृत्य... या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. हत्तीणीनं आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपण तिची निर्दयीपणे हत्या केली, अशा शब्दात सुरेश रैनानं राग व्यक्त केला.