नवी दिल्ली: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० ला अलविदा केले तरीही दोन्ही दिग्गजांना बीसीसीआयकडून यंदा मध्यवर्ती कराराअंतर्गत 'अ प्लस' श्रेणीत स्थान देण्यात येणार आहे. त्यापोटी दोघांनाही ७-७ कोटी रुपये दिले जातील. हे दोन्ही खेळाडू सन्मानाचे हकदार असल्याचे बोर्डाचे मत आहे. सध्याच्या 'अ प्लस' श्रेणीत या दोघांशिवाय जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा यांना स्थान देण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या स्थानावरील फलंदाज श्रेयस अय्यरचे मध्यवर्ती करारात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. श्रेयसला मागच्या सत्रात स्थानिक सामने खेळण्यास नकार दिल्यामुळे मध्यवर्ती करारातून डच्चू देण्यात आला होता, श्रेयसने चॅम्पियन्स ट्रॉफीत ४९ च्या सरासरीने २४३ धावा केल्या होत्या.
अभिषेक, वरुण, नितीशला स्थान मिळणार
अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी आणि वरुण चक्रवर्ती हे प्रथमच बोर्डाच्या मध्यवर्ती करारात सहभागी होऊ शकतात. नितीशने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केली. अभिषेक शर्माने यंदा १२ टी-२० सामन्यात ४११ धावा ठोकल्या. मुख्य कोच गौतम गंभीर २ आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची गुवाहाटी येथे ३० मार्च रोजी बैठक होणार होती, पण काही जणांच्या अनुपस्थितीमुळे कराराला अंतिम स्वरूप देणारी ही बैठक लांबणीवर पडली आहे.
ईशानचा विचार नाही...
ईशान किशनबाबत सूत्रांचे मत असे की, त्याला मध्यवर्ती करारात परतण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागेल. त्याने काही मुद्दे निकाली काढले मात्र तरीही किमान आणखी वर्षभर तो करारातून बाहेर राहू शकतो.