Rohit Sharma vs Virat Kohli, Ravi Shastri: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली हे दोघेही सध्या फॉर्मशी झगडत आहेत. रोहित शर्माला यंदाच्या हंगामातील १० सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. तर विराट कोहलीने केवळ एकच अर्धशतक झळकावलं आहे. दोघांच्याही फलंदाजीच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटला दीड-दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याच मुद्द्यावरून ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने रवी शास्त्रींना प्रश्न विचारला.
"रवी शास्त्री विराट कोहलीबद्दल जे बोलले तेच रोहित शर्माबद्दल बोलतील का? मला कल्पना आहे की हे खेळाडू सर्व प्रकारच्या स्पर्धा आणि दौरे करतात. क्रिकेटच्या विविध मालिका हल्ली फार वेगाने आयोजित केल्या जातात. अशा वेळी तुम्ही एका ठराविक मानसिक स्थितीमध्ये जाता आणि त्याचा परिणाम तुमच्या कामगिरीवर होतो. विराट कोहली गेले कित्येक महिने क्रिकेट खेळतोय आणि चांगल्या मनस्थितीत आहे. पण कधीकधी तुमचा खेळ चुकतो आणि तुम्ही दडपणाखाली येता. पण मूळ मुद्दा म्हणजे, शास्त्रींनी सांगितलं की विराटने विश्रांती घ्यायला हवी, तसंच ते रोहित शर्माबद्दलही म्हणतील का?", असा सवाल मॅथ्यू हेडनने उपस्थित केला.
"खेळाडू कितीही मोठा असेल तरीही 'मला संघाबाहेर ठेवा' असं कोणीही निवड समितीला सांगत नाही. कारण त्यासाठी खूप हिंमत लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा वाईट फॉर्मशी झुंजत असता तेव्हा तुम्हाला स्वत:ला सिद्ध करायचं असतं. तुम्हाला अख्ख्या सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी करायची इच्छा असते. जेव्हा तुम्ही सातत्याने खराब कामगिरी करता आणि तुम्हाला चूक सापडत नाही तेव्हा स्वत:चा खूप राग येतो. रवी शास्त्री प्रशिक्षक असताना त्यांच्यासोबत विराट कर्णधार म्हणून काम करत होता. त्यामुळे ते एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात.", असेही हेडन म्हणाला.