भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पुन्हा अपयश आले अन् कर्णधार रोहित शर्मावर ( Rohit Sharma) टीकेचे बाण सुटू लागले. २०२१ मध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागल्यानंतर २०२३ मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ICC स्पर्धांचा दुष्काळ संपवेल, अशी आशा चाहत्यांना होती. पण, रोहितला WTC Final मध्ये फॉर्मही नाही गवसला अन् भारताला ट्रॉफीही नाही मिळाली. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात २-१ अशा पराभवानंतर विराट कोहलीनं कसोटी संघाचे नेतृत्व सोडले अन् रोहितच्या गळ्यात ती माळ पडली. त्याआधी विराटने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले होते आणि वन डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी झाली. अशात रोहितकडे टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या संघाचे कर्णधारपद आले.
पण, समोर येत असलेल्या वृत्तानुसार ३६ वर्षीय रोहितला कसोटी संघाचा कर्णधार व्हायचेच नव्हते. BCCI चे तत्कालिन अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी त्याला ही जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले. विराटने अचानक कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित प्रबळ दावेदार होता. पण, रोहितला त्याचे शरीर ही जबाबदारी पेलण्यासाठी किती तयार आहे, याबाबत त्यालाही शंका होती आणि म्हणून तो सुरुवातीला कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी तयार नव्हता, असे सूत्रांनी सांगितले. ''सौरव गांगुली आणि जय शाह यांनी रोहित शर्माला या जबाबदारीसाठी राजी केले. लोकेश राहुलला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नेतृत्वात छाप पाडता आली नसल्याने हा निर्णय घेतला गेल्याचे,'' सूत्रांनी म्हटले.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-० अशा फरकाने श्रीलंकेवर विजय मिळवला. पण, त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत त्याला खेळता आले नाही. त्यानंतर बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकला होता. २०२३च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून त्याने पुनरागमन केले आणि भारताने ती मालिका २-१ ने जिंकली. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने मागील आठवड्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळली, परंतु भारताला २०९ धावांनी हार मानावी लागली.