T20 World Cup 2022 : भारतीय संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रवाना झाला. BCCI ने टीम इंडियाचे खेळाडू व सहाय्यक स्टाफ सदस्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक आदी १४ खेळाडूच या फोटोत दिसल्याने चाहते बुचकळ्यात पडले आहेत. त्यात अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा ( Deepak Hooda) हा दुखापतीतून सावरला आहे आणि तो वर्ल्ड कपसाठी उपलब्ध आहे. जसप्रीत बुमराहच्या माघारीनंतर त्याची रिप्लेसमेंट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच १४ खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) पत्नी रितिका व मुलगी समायरा यांच्यासह दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला.
विराट कोहलीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने मालिका विजयांचा सपाटा लावलाय. पण, आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारताला अपयश आले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार आहे आणि मागील वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या मानहानीनंरत टीम इंडियाला यंदा चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्यामुळे रोहित व टीम इंडियावर दडपण असणार आहे. त्यात रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह हे दोन प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेत खेळणार नाही. अशात रोहितच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
सराव सामन्यांचं वेळापत्रक ( Warm-up matches of the Indian team)
- भारत वि. स्थानिक क्लब, १० ऑक्टोबर
- भारत वि. स्थानिक क्लब, १२ ऑक्टोबर
- भारत वि. ऑस्ट्रेलिया, १७ ऑक्टोबर
- भारत वि. न्यूझीलंड, १९ ऑक्टोबर
मुख्य स्पर्धेतील वेळापत्रक
- २३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
- २७ ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, दुपारी १२.३० वाजल्यापासून, सिडनी
- ३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून, पर्थ
- २ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, दुपारी १.३० वाजल्यापासून, एडलेड
- ६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
- १३ नोव्हेंबरला अंतिम सामना
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स, डिस्नी हॉटस्टार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"