आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. फ्रँचायझीने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिले, तेव्हा त्यांना अशा प्रकारे स्पर्धेबाहेर व्हावे लागेल असे कोणाला वाटले नव्हते. पण वानखेडे स्टेडियमवर मुंबईला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. संघाचा ११ सामन्यातील हा आठवा पराभव आहे. या सामन्यात संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली.
१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सला इशान किशनने वेगवान सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या षटकात त्याने मिचेल स्टार्कविरुद्ध दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर इशानने षटकार ठोकला. पण स्टार्कने अनुभवाचा वापर करताना पुढच्याच चेंडूवर इशानला बोल्ड केले. इशानने पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याचा लेग स्टंप उडून गेला. हा सामना पाहण्यासाठी रोहित शर्माची पत्नी रितिकाही वानखेडे स्टेडियमवर उपस्थिती होती. इशान बोल्ड झाला यावर तिचा विश्वास बसत नव्हता. इशान बोल्ड झाल्यावर कॅमेरा रितिकाकडे गेला. तिला पूर्ण धक्का बसला आणि तिने आपला चेहरा हाताने झाकून घेतला. इशान किश्नेने ७ चेंडूत १३ धावांची खेळी केली.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा २४ धावांनी पराभव केला. विजयासाठी १७० धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ १८.५ षटकांत सर्वबाद १४५ धावांवर आटोपला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५६ धावांचे योगदान दिले. केकेआरकडून मिचेल स्टार्कने चार तर वरुण चक्रवर्ती, सुनील नरीन आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.