मुंबई : न्यूझीलंड 'A' विरुद्ध होणाऱ्या चार दिवसीय सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला. ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेता रोहितचे भारत 'A' संघाकडून खेळणे महत्त्वाचे होते, परंतु बीसीसीआयने रोहितला विश्रांती देण्याचा निर्णय घेत नेटीझन्सचा रोष ओढावून घेतला आहे.
बीसीसीआयचा हा निर्णय चाहत्यांना काही पटलेला नाही. कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रोहितला चार दिवसीय सामन्यात खेळवायला हवं होतं असं मत अनेकांनी व्यक्त केलं. ट्वेंटी-20 मालिकेपेक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची असल्याची आठवण अनेकांनी बीसीसीआयला करून दिली. बीसीसीआयचा हा निर्णय म्हणजे कसोटी संघातील रोहितच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असल्याचे मत व्यक्त करत बीसीसीआयवर सडकून टीका केली.