मुंबई : आयपीएलच्या ११व्या सत्रासाठी लीगमधील सर्व ८ फ्रेंचाईजींनी संघातील काही प्रमुख खेळाडू आपल्याकडे कायम राखले आहेत. गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक फ्रेंचाईजीने आपले प्रमुख खेळाडू जाहीर केले. दोन वर्षांच्या बंदीला सामोरे गेल्यानंतर पुनरागमन केलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 'सीएसके'ने अपेक्षेप्रमाणे खेळाडू जाहीर करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना कायम ठेवले. तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सनेही अपेक्षित खेळाडू जाहिर करताना कर्णधार रोहित शर्मा, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह यांना कायम राखले.
यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चँलेंजर्स बंगलोर (आरसीबी) यांनी सर्वांनाच धक्का दिला. पंजाबने केवळ एकच खेळाडू कायम ठेवत अनपेक्षितपणे फिरकी अष्टपैलू अक्षर पटेलला पसंती दिली. त्याचवेळी आरसीबीने ३ खेळाडू कायम ठेवत कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स या प्रमुख खेळाडूंसह युवा सर्फराज खान याची निवड करत सर्वांनाच धक्का दिला.
फेब्रुवारी महिन्यात आयपीएल खेळाडूंचा बंगळुरूमध्ये लिलाव होणार असून यावेळी उर्वरीत सर्व खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील.
Csk - महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
DD : रिषभ पंत, क्रिस मॉरिस, श्रेयस अय्यर.
KXIP : अक्षर पटेल
KKR : सुनील नरेन, आंद्रे रसेल.
MI : रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह.
RR : स्टीव्ह स्मिथ.
RCB : विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, सर्फराज खान.
SH : डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार.