मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या दुखापतीचं गुढ अजूनही कायम आहे. दुखापतीमुळे रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. पण, त्याचवेळी चार सामन्यांच्या विश्रांतीनंतर रोहित Indian Premier League ( IPL 2020) मध्ये मैदानावर उतरला. 10 नोव्हेंबरला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) विरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसेल. जर रोहित आयपीएलसाठी तंदुरुस्त आहे, तर मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का नाही? असा सवाल BCCIला केला जात आहे. बीसीसीआयही रोहितच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन आहेत.
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितला दुखापत झाली होती. त्यानंतर बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघांची घोषणा केली. वन डे, ट्वेंटी-20 आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या एकाही संघात रोहितचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याचवेळी बीसीसीआयनं रोहितच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेऊन असू, असे स्पष्ट केले. पण, काही मीडियाच्या वृत्तानुसार रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियासोबत जाणार असल्याचा दावा केला गेला. मात्र, प्रत्यक्षात रोहितला तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल आणि तरच त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाता येईल, हे बीसीसीआयच्या निवड समितिनं स्पष्ट केलं.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाचे फिजिओ नितिन पटेल यांनी रोहित तंदुरूस्त असल्याचा दाखला दिल्यावरच तो ऑस्ट्रेलियाला संघासोबत जाऊ शकेल. ''टीम इंडियाचे फिजिओ नितिन पटेल हे फिटनेस टेस्ट घेतील आणि त्यात पास झाल्यावरच रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकेल. पटेल व राष्ट्रीय क्रिकेट अकादमी त्याला तंदुरुस्त जाहीर करत नाहीत, तोपर्यंत तो ऑस्ट्रेलियात जाऊ शकणार नाही,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
''रोहित या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त व्हावं, ही आमची इच्छा आहे. विराट कोहलीनं वैयक्तिक कारणास्तव तीन कसोटी सामन्यांना मुकणार असल्याचे बीसीसीआयला पत्राद्वारे कळवले आहे,''असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केलं.