Join us  

Rohit Sharma चा विश्वविक्रम थोडक्यात बचावला; 'या' फलंदाजाने वन-डे मध्ये ठोकल्या 250+ धावा (Video)

Rohit Sharma, Oliver Hairs 255 Runs One Day match: अवघ्या १३० चेंडूत डावखुऱ्या ओली हेअर्सने कुटल्या २५५ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:25 AM

Open in App

Oliver Hairs, 255 Runs One Day match: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने श्रीलंकेविरूद्ध खेळलेली २६४ धावांची खेळी क्रिकेटप्रेमी कधीच विसरु शकत नाहीत. वन-डे क्रिकेटमध्ये त्याच्या इतकी स्फोटक खेळी कोणीही खेळू शकलेले नाही. पण नुकताच एका फलंदाजाने त्याच्या खेळीच्या नजीक जाणारी झंझावाती खेळी केली. स्कॉटलंड ए आणि ओमान यांच्यातील सामन्यात स्कॉटलंडच्या ऑलिव्हर हेअर्स या डावखुऱ्या फलंदाजाने तुफानी खेळी केली. स्कॉटलंड ए चा फलंदाज ऑलिव्हर हेयर्सने रोहित शर्मासारख्या बिनधास्त शैलीत खेळत केवळ १३० चेंडूत २५५ धावांची खेळी केली.

हेअर्सचे झंझावाती द्विशतक

ऑलिव्हर हेअर्स हा फलंदाज सलामीला आणि त्याने क्रीझवर येताच चौकार-षटकारांची बरसात केली. या खेळाडूने सर्वप्रथम केवळ ५७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर दीडशतकासाठी त्याने ८२ चेंडू घेतले. तर १०९ चेंडूत त्याने द्विशतकही पूर्ण केले. द्विशतकानंतर तर त्याचा फलंदाजीचा वेग आणखी वाढला. पुढल्या १७ चेंडूत त्याने २५० धावांचा टप्पादेखील गाठला.  ऑलिव्हर हेअर्सने १३० चेंडूत २५५ धावांची खेळी केली.

स्कॉटलंड अ संघाने ४७.२ षटकांत ३८५ धावा केल्या. हे आव्हान ओमानच्या संघाला पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ १०३ धावांतच गारद झाला. त्यांच्याकडून झीशान मकसूदने सर्वाधिक ३० धावा केल्या.

ऑलिव्हर हेअर्स कोण आहे?

ऑलिव्हर हेअर्स हा ३३ वर्षांचा असून त्याने २०१० मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आश्चर्याची बाब म्हणजे ८ दिवसांत त्याने ५ एकदिवसीय सामने खेळले होते आणि त्यात तो फ्लॉफ ठरल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. त्याने केवळ १४च्या सरासरीने ६८ धावा केल्या होत्या. यानंतर त्याला गेल्या १४ वर्षात आंतरराष्ट्रीय संघात खेळवलेले नाही. मात्र आज स्कॉटलंड अ संघाकडून त्याने केलेल्या झंझावाती खेळीनंतर त्याचे संघात पुनरागमन होऊ शकते.

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघश्रीलंका