Rohit Sharma World Record in T20: नागपूरात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात (IND vs AUS 2nd T20) भारतीय कर्णधार रोहित शर्माने तुफानी फलंदाजी केली. रोहितने अवघ्या २० चेंडूत नाबाद ४६ धावा कुटल्या. त्यात चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघ हा सामना सहा गडी राखून जिंकू शकला. दोन्ही बाजूने ८-८ षटकांचा सामना रंगला. त्यात ऑस्ट्रेलियाने ८ षटकांत दमदार फटकेबाजी करत ९० धावा केल्या. पण भारताने 'हिटमॅन'च्या झंझावाती खेळीच्या जोरावर ७.२ षटकांतच सामना खिशात घातला. रोहितच्या दमदार खेळीमुळे त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
रोहित शर्माने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला मागे टाकत टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाचा मान मिळवला. दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी रोहित आणि गप्टिल दोघांच्या नावावर १७२ षटकारांची नोंद होती नोंदवले गेले होते. रोहित शर्माने भारतीय डावाच्या पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या चेंडूवर षटकार ठोकून गप्टिलला मागे टाकले.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (Top 5)-
- रोहित शर्मा (भारत) - १३८ सामने, १७६ षटकार
- मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड) - १२१ सामने, १७२ षटकार
- ख्रिस गेल (विंडिज) - ७९ सामने, १२४ षटकार
- इऑन मॉर्गन (इंग्लंड/आयर्लंड) - ११५ सामने, १२० षटकार
- आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया) - ९४ सामने, ११९ षटकार
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक धावा
रोहित शर्मा आधीच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. रोहित शर्माने आतापर्यंत १३८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यात त्याच्या नावावर ३२.५३ च्या सरासरीने ३,६७७ धावा आहेत. रोहित शर्माने आत्तापर्यंत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतके आणि २८ अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत दुसरा क्रमांक भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आहे. विराट कोहलीने आतापर्यंत १०६ सामन्यांमध्ये ५०.६६ च्या सरासरीने ३,५९७ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे.