रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकतेच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. एक कर्णधार म्हणूनच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनही रोहित किती महान आहे, हे या मालिकेत घडलेल्या काही प्रसंगावरून दिसले. अनुभवी गोलंदाज आर अश्विन आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने मालिकेनंतर रोहितच्या मनाचा मोठेपणा जगाला सांगितला. आता रोहित शर्मा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सज्ज होतोय. आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असणारा कर्णधार रोहित यंदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार नाही. फ्रँचायझीने यंदा नेतृत्वाची जबाबदारी गुजरात टायटन्सकडून पुन्हा MI मध्ये आलेल्या हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने हार्दिक व जसप्रीत बुमराह हे स्टार भारतीय संघाला दिले. पण, या दोघांची कारकीर्द खऱ्या अर्थाने रोहितने वाचवली. भारताचा माजी व मुंबई इंडियन्सचा माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेल याने रोहितने कशा प्रकारे या दोन खेळाडूंच्या कारकीर्दिला वाचवले हे सांगितले. पार्थिव याच्या दाव्यानुसार मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने बुमराहला दुसऱ्या पर्वात खेळवायचेच नाही, असा निर्णय जवळपास घेतलाच होता. पण, रोहितमुळे बुमराहला संधी मिळाली आणि तो आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतोय...
"रोहित नेहमीच खेळाडूंसोबत असतो आणि त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या. बुमराह २०१४ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला, परंतु २०१५ मध्ये पहिल्या हंगामात त्याला तितकी चांगली कामगिरी करता आली नाही. सीझनच्या मध्यंतरात MI ने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु रोहितने हा एक स्टार खेळाडू बनेल असे म्हणून त्याला संघात कायम ठेवायला लावले. २०१६ पासून बुमराहची कामगिरी अव्वल स्तरावर पोहोचली हे आपण पाहतोय," असे पार्थिवने म्हटले.
बुमराह प्रत्यक्षात २०१३ मध्ये सामील झाला होता, परंतु पहिल्या तीन हंगामात १७ सामन्यांत त्याला केवळ ११ विकेट्स घेता आल्या असत्या. २०१६ मध्ये त्याने १४ सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या आणि मागे वळून पाहिले नाही. रोहितने पंड्यावरही असाच विश्वास दाखवला. २०१५ मध्ये ११२ धावा केल्या आणि १ बळी घेतल्यानंतर, हार्दिकने भारतीय संघाकडून पदार्पण केले. २०१६च्या पर्वात त्याला ११ सामन्यांत ४४ धावा करता आल्या आणि फक्त ३ विकेट्स घेतल्या होत्या.
"हार्दिक पांड्याचेही असेच होते. २०१६ मध्ये त्याचा हंगाम खराब होता. जेव्हा अनकॅप्ड खेळाडू चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा त्याला फ्रँचायझी सहज रिलीज करत होती. पण, हार्दिकच्या बाबतीत रोहितने तसे होऊ दिले नाही," असेही पार्थिवने सांगितले.