नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो एकमेव फलंदाज ठरला आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्येही रोहितने द्विशतक पूर्ण केले, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण रोहितने तिनुवनंतरपुरम येथे झालेल्या सामन्यात द्विशतक पूर्ण केले आहे.
पाचव्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा १०४ धावांत खुर्दा उडवला होता. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद ६२ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आता तुम्ही म्हणाल की, रोहितने जर ६२ धावा केल्या तर त्याचे द्विशतक कसे काय पूर्ण होऊ शकते.
रोहितने ६२ धावांची खेळी साकारताना चार षटकार लगावले होते. त्यामुळे रोहितने या सामन्यात द्विशतक पूर्ण केले ते षटकारांचे. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर १९८ षटकार होते. या सामन्यात चार षटकार लगावले. त्यामुळे त्याच्या नावावर आता २०२ षटके असतील.
रोहितने मुंबईतील सामन्यात शतक झळकावले. यावेळी त्याने सचिन तेंडुलकरचा १९५ षटकारांचा विक्रम मोडीत काढला होता.