मेलबर्न: पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या सलामीला वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या वेगवान आणि स्विंग चेंडूंना तोंड देण्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने अतिरिक्त सरावावर भर दिला. शाहीनविरुद्ध कुठलाही चुकीचा फटका मारण्यापासून वाचण्यासाठी रोहितने प्रत्येक फटक्याचा सराव केला.
मेलबर्नचे मैदान अन्य स्टेडियम्सच्या तुलनेत वेगळे आहे. खेळाडू एखाद्या मोठ्या विहिरीत सराव करताना येथे पाहायला मिळतात. रोहितने दिनेश कार्तिकसह सुमारे दीड तास फलंदाजीचा सराव केला. यादरम्यान त्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडशी संवादही साधला. काही वेळाचा ब्रेक घेतल्यानंतर रोहितने पुन्हा नेट्समध्ये घाम गाळला. यावेळी त्याने श्रीलंकेचे डावखुरे थ्रो डाऊन तज्ज्ञ नुवान सेनेविरत्नेचा सामना केला.
बीसीसीआयने शुक्रवारी ट्विटरवर एक फोटो शेअर केला. यात भारतीय खेळाडू सराव करताना दिसत आहेत. काही खेळाडू सामान्य प्रशिक्षण घेत आहेत, तर काही मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडभोवती फिरत आहेत. यादरम्यान आकाशात ढग दिसत आहेत. मेलबर्नमध्ये काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे.
सर्वधिक चिंता पावसाचीचभारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान रविवारी पावसाची शक्यता आहे. असे झाल्यास जगभरातील क्रिकेट चाहत्यांची निराशा होईल. ला निनामुळे ऑस्ट्रेलियातील अनेक भाग सरासरीपेक्षा जास्त उष्णता अनुभवत आहेत. अशा स्थितीत भारत-पाक सामना अडचणीत आहे, ऑस्ट्रेलिया सरकारच्या संकेतस्थळानुसार सकाळी व दुपारी पावसाची शक्यता खूप जास्त आहे.