मुंबई : सध्याच्या घडीला सर्वात चर्चेत आहे तो भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत रोहितने शतकासह काही विश्वविक्रम रचले होते. त्याचबरोबर रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजवर 3-0 असे निर्भेळ यश संपादन केले होते. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल की, याच दिवशी रोहित शर्माचा 'हिटमॅन' झाला होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात पहिले द्विशतक भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने फटकावले होते. पण रोहितच्या नावावर आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात तब्बल तीन द्विशतके आहेत. आणि आजच्याच दिवशी त्याला 'हिटमॅन' ही पदवी बहाल करण्यात आली होती.
तो दिवस होता 13 नोव्हेंबर 2014. भारतासमोर आव्हान होते ते श्रीलंकेचे. रोहित नेहमीप्रमाणे फलंदाजी आला, पण त्याने एक विश्वविक्रम रचत चाहत्यांना अवीट आनंद दिला. या सामन्यात रोहितने 264 धावांची अतुलनीय खेळी साकारली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. ही 264 धावांची खेळी रोहितने 173 चेंडूंमध्ये साकारताना तब्बल 33 चौकार आणि 9 षटकार लगावले होते.