- अयाझ मेमन
बीसीसीआयने सोमवारी रात्री ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. राष्ट्रीय निवड समितीने या दौऱ्यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तीन प्रकारासाठी तीन संघांची घोषणा केली. या दौऱ्यासाठी एकूण ३२ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे. अतिरिक्त चार युवा वेगवान गोलंदाजांनाही या दौऱ्यासाठी नेण्यात येणार आहे. कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, सुशांत पोरेल आणि टी. नटराजन या वेगवान गोलंदाजांना भारतीय संघासोबत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
या संघ निवडीबाबत काही गोष्टींवर मोठी चर्चा रंगत आहे. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे रोहित शर्माची न झालेली निवड. तसं, तर रोहित तिन्ही प्रकारात स्थान मिळवणारा हुकमी खेळाडू, पण यावेळी त्याला एकाही संघात स्थान मिळालेले नाही. बीसीसीआयच्या मतानुसार, तो अजूनही दुखापतग्रस्त आहे. शिवाय त्याच्यासोबत ईशांत शर्माच्या दुखापतीवरही बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे.
भारताचा दौरा २७ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंकडे सज्ज होण्यासाठी भरपूर वेळ आहे. पण, यासाठी १५ दिवसाचा क्वारंटाईन कालावधीही हेही त्यांनी विसरता कामा नये.
रोहित जर खेळणार नसेल, तर हे मुंबईसाठी फार मोठे नुकसान ठरेल.सध्याच्या परिस्थितीमध्ये मुंबईचा प्ले-ऑफ प्रवेश जवळपास निश्चित आहे. उत्सुकता आहे ती, मुंबई गुणतालिकेत कोणत्या स्थानावर राहत बाद फेरी गाठणार. पुन्हा एकदा विजेतेपद त्यांच्या आवाक्यात दिसत आहे, मात्र संघाचा मुख्य फलंदाज आणि कर्णधार खेळणार नसेल, तर हा मुंबईसाठी खूप मोठा झटका असेल.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या रोहितला दुखापतीमुळे भारतीय संघात समाविष्ट केले नाही, पण त्याच्या दुखापतीवर मेडिकल टीम अहवाल देईल. तरी, भारतीय संघाची पूर्ण इच्छा आहे की, कशाप्रकारे तरी रोहितला ऑस्ट्रेलियाला नेता यावे. कदाचित सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी रोहितचा सहभाग नसेल, पण त्यानंतर मात्र त्याला तयार करण्यावर भर असू शकेल.
Web Title: Rohit Sharma's non-selection for Australia tour is shocking
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.