भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मानं द्विशतकी खेळी केली. या खेळीनंतर रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सर्वांच्या शुभेच्छा त्याने स्वीकारल्या आणि एक धक्कादायक खुलासाही केला आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, " मला सलामीला खेळायची चांगली संधी मिळाली. या संधीचा फायदा उठवण्याचे मी ठरवले होते. जर या संधीचा मी फायदा उचलला नसता तर बरंच काही घडलं असतं. तुम्ही पत्रकारांनीही काही तरी लिहिलं असतं."
पाहा व्हिडीओ
उपाहारापूर्वी 199 धावांवर असलेल्या रोहितला कसोटीतील पहिल्या वैयक्तिक द्विशतकासाठी जवळपास तासभर वाट पाहावी लागली. उपाहारानंतर पहिली दोन षटकं निर्धाव गेल्यानंतर रोहितनं त्याच्या स्टाईलनं द्विशतक पूर्ण केले. त्यानं खणखणीत षटकार खेचून दोनशे धावांचा पल्ला ओलांडला. कसोटीत षटकार खेचून द्विशतक साजरा करणारा रोहित हा जगातला पहिलाच फलंदाज ठरला असावा. शिवाय एकाच कसोटीत शतक व द्विशतक पूर्ण करण्यासाठी षटकार खेचणाराही तो पहिलाच खेळाडू आहे.
रोहित द्विशतकाचे त्रिशतकात रुपांतर करेल असे वाटले होते, परंतु कागिसो रबाडानं त्याची ही घोडदौड थांबवली. रोहित 255 चेंडूंत 28 चौकार व 6 षटकार खेचून 212 धावांत माघारी परतला. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच द्विशतक असले तरी हे त्याचे पाचवे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील द्विशतक ठरले. त्यानं 2009मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करताना गुजरातविरुद्ध नाबाद 309 धावा चोपल्या होत्या. 2006 साली गुजरातविरुद्ध 205, 2012 साली पंजाबविरुद्ध 203 आणि 2010मध्ये बंगालविरुद्ध 200* अशी त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील द्विशतकं आहेत.
रोहितचा तो षटकार हा कसोटी क्रिकेटमधील त्याचा पन्नासावा षटकार ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांत वीरेंद्र सेहवाग ( 91) अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ( 78), सचिन तेंडुलकर ( 69), कपिल देव ( 69), सौरव गांगुली ( 57) आणि रोहित शर्मा ( 51) यांचा क्रमांक येतो. रोहितनं या द्विशतकासह Fantastic Four दिग्गजांमध्ये स्वतःच नाव समाविष्ठ केलं आहे. वन डे आणि कसोटीत द्विशतक झळकावणारा रोहित चौथा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी अशी कामगिरी केली आहे. रोहितनं वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावली आहेत.