विशाखापट्टणम : ह्यखेळपट्टीवर जास्त वेळ काढ, तू नक्की यशस्वी होशील,ह्ण शालेय प्रशिक्षकांनी दिलेला हा सल्ला तंतोतंत पाळताना रोहित शर्माने तुफानी पुनरागमन करीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद शतक झळकावले. सलामीवीर म्हणून पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळताना रोहितने टीम इंडियाची सर्वांत मोठी अडचणही सोडवली. त्याच्यासोबत मयांक अगरवालनेही नाबाद अर्धशतकी खेळी केल्याने भारताने पहिल्या दिवसअखेर आफ्रिकेविरुद्ध ५९.१ षटकांत बिनबाद २०२ धावा अशी भक्कम धावसंख्या उभारली. रोहितने चौथे कसोटी शतक झळकावले असून, मयांक पहिल्यावहिल्या कसोटी शतकाच्या दिशेने कूच करीत आहे.
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्याने तिसऱ्या सत्रात एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. नाहीतर रोहित-मयांक यांनी भारताची बाजी आणखी भक्कम केली असती. रोहितने १७४ चेंडूंत १२ चौकार व ५ उत्तुंग षटकार ठोकत नाबाद ११५ धावांचा तडाखा दिला, तर मयांकने १८३ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८४ धावा केल्या आहेत.
या सामन्याआधी भारतीय संघापुढे सलामी जोडीचा पेच होता. मात्र त्याहून अधिक मोठा प्रश्न सलामीला खेळताना रोहित यशस्वी होणार का, हा होता. रोहितचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांनी या सामन्याआधी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले होते की, ह्यरोहितने खेळपट्टीवर जास्त वेळ टिकून खेळपट्टीचा अंदाज घेतला, तर तो नक्कीच यशस्वी पुनरागमन करेल.ह्ण आणि झालेही तसेच. रोहितने प्रथम सावध पवित्रा घेत खेळपट्टीचा अंदाज घेतला. त्याचवेळी त्याने मजबूत गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाºया दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचाही अंदाज घेतला.
रोहितने वेगवान गोलंदाजांविरुद्ध कोणताही अतिरिक्त धोका पत्करला नाही, मात्र फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याने आपल्या लौकिकानुसार फटकेबाजी केली. खेळपट्टीवर जम बसताच त्याच्या पायांच्या हालचालीमध्येही आत्मविश्वास दिसून आला. त्याने आपल्या खास शैलीतील पुढे सरसावत केलेली फटकेबाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. या धमाकेदार खेळीसह रोहितने सलामीवीर म्हणून संघातील स्थानही भक्कम केले.
मयांक-रोहित यांच्या फटकेबाजीपुढे दक्षिण आफ्रिकेचे सर्वच गोलंदाज हतबल झाले. पहिल्या सत्रानंतर आफ्रिकेचे गोलंदाज पुनरागमन करतील अशी आशा होती, मात्र यानंतर मयांक-रोहित यांनी अधिक आक्रमक होत गोलंदाजांवर आणखी दडपण आणले. हे दोघेही भारताची मजबूत धावसंख्या उभारणार असे दिसत असतानाच अंधूक प्रकाशमानामुळे चहापानाच्या निर्धारित वेळेच्या आठ मिनिटे आधीच खेळ थांबविण्यात आला. यानंतर पावसानेही हजेरी लावल्याने दिवसभरातील उर्वरित खेळ रद्द करण्यात आला. सामन्याआधी पावसाची शक्यता ८० टक्के सांगण्यात आली होती.
सामन्याचा पहिला दिवस गाजवला तो ह्यहिटमॅनह्ण रोहित शर्मा याने. त्याने आपल्या खेळीदरम्यान अनेक विक्रमही रचले. सलामीवीर म्हणून पहिला सामना खेळताना शतक झळकावण्याची कामगिरी करणारा रोहित चौथा भारतीय ठरला. याआधी अशी कामगिरी शिखर धवन, लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांनी केली होती.
Web Title: Rohit Sharma's super hit comeback !, century against South Africa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.