मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या पदाला आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत तरी धोका नाही. पण, रोहितचे कर्णधारपद धोक्यात आल्यात जमा आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतासा ऑस्ट्रेलियाकडून २०९ धावांनी हार पत्करावी लागली आणि भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धांचा १० दुष्काळ कायम राहिला. रोहितचं वय आणि आगामी WTC स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन आता BCCI काही पावलं उचवण्याची शक्यता आहे. WTC Final मधील पराभवामुळे बीसीसीआय नाराज नक्कीच आहे, परंतु ते तडकाफडकी रोहितची उचलबांगडी करणार नाहीत. रोहितचे कसोटी कर्णधारपद आता पुढील २ सामन्यांवर टीकून आहे.
राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा कोच कोण? गौतम गंभीर, आशिष नेहरासह ३ परदेशी नावं चर्चेत
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दोन आयसीसी स्पर्धांमध्ये अपयश आले आहे. मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती. WTC Final च्या निकालाने रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार WTC 2023-25 मध्येही रोहित टीम इंडियाचे कसोटी कर्णधारपद भूषविण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतून होणार आहे. पण, या दोन कसोटीत रोहित शर्मा अपयशी ठरला, तर त्याची उचलबांगडी होऊ शकते, असा अंदाज आहे.
''या सर्व बाष्कळ चर्चा आहेत. रोहित शर्माच्या कर्णधारपदाला कोणताच धोका नाही. २०२५च्या WTC पर्यंत तो ३८ वर्षांचा होईल त्यामुळे त्याच्या कामगिरीवर लक्ष असेल. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर शिवसुंदर दास आणि त्याची टीम लक्ष ठेऊन आहेत आणि त्यातील त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीनंतर निर्णय घेतला जाईल,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी PTI ला सांगितले.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-० अशा फरकाने श्रीलंकेवर विजय मिळवला. पण, त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत त्याला खेळता आले नाही. त्यानंतर बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकला होता. २०२३च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून त्याने पुनरागमन केले आणि भारताने ती मालिका २-१ ने जिंकली.