राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपताच संघातील शिलेदार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या जागी गौतम गंभीरची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकला. या विश्वचषकासह द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. तर रोहित शर्माने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचे मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी हिटमॅन रोहितने नुकतीच एक खास पोस्ट लिहिली. आता रोहितची पत्नी रितीका सजदेह हिनेही द्रविड यांच्यासाठी चारोळ्या लिहिल्या आहेत.
रोहितने म्हटले की, डिअर राहुल भाई, तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना योग्यरित्या व्यक्त करण्यासाठी मी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मी योग्य लिहीन याची खात्री नाही पण प्रयत्न करत आहे. रितीकाने रोहितची पोस्ट इन्स्टा स्टोरीवर ठेवत प्रतिक्रिया दिली. तिने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, खूप साऱ्या भावना आहेत. द्रविड तुम्ही आमच्या कुटुंबासाठी खूप काही आहात. तुम्हाला आम्ही नेहमीच मिस करू. पण, मला वाटते की, आमची लेक सॅमी (समायरा) तुम्हाला खूप मिस करेल.
रोहितची भावनिक पोस्ट लहानपणापासून मी इतर कोट्यवधी लोकांप्रमाणेच तुझ्याकडे पाहिले आहे. पण तुझ्यासोबत जवळून काम करता आले यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तू या खेळातील दिग्गज व्यक्ती आहेस. परंतु, तू सर्वकाही सोडून, इतर गोष्टींचा त्याग करून आमच्यासाठी प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहिलास. ही तू आम्हाला दिलेली मोठी देणगी आहे. तुझी नम्रता आणि एवढ्या काळानंतरही या खेळावर असलेले तुझे प्रेम... मी तुझ्याकडून खूप काही शिकलो आहे आणि प्रत्येक आठवण जपेन, असेही रोहितने नमूद केले.