Join us  

रोहितने ‘पूल शॉट’ कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायला हवा; सुनील गावसकर यांनी दिला मोलाचा सल्ला

रोहितकडे मारण्यासारखे बरेच फटके आहेत. ज्या गोलंदाजांकडे थोडा वेग आहे तो विचार करेल की माझ्या चेंडूवर एक- दोन षट्कार किंवा चौकार लागले तरी काही बिघडणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 5:39 AM

Open in App

बेंगळुरु : शतकाकडे वाटचाल करत असताना कर्णधार रोहित शर्मा याने ८०-९० धावांवर आपला आवडता पूलचा फटका कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून दिलेला बरा. असे केल्यास तो मोठी खेळी करू शकेल, असा मोलाचा सल्ला दिग्गज सुनील गावसकर यांनी श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या डे-नाईट कसोटीआधी दिला आहे. रोहित हा पहिल्या कसोटीत लकमलच्या चेंडूवर पूलचा फटका मारताना झेलबाद झाला होता, हे विशेष.

रोहित शर्मा याला ‘पूल शॉट’ खेळणे किती आवडते हे चाहत्यांना अवगत आहे. रोहितने पहिल्या कसोटीत  २८ चेंडूत सहा चौकारांसह २९ धावा केल्या होत्या. होत्या. गावसकर यांनी दुसऱ्या सामन्याआधी स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना रोहितला हा मोलाचा सल्ला देताना सांगितले की, पूलचा फटका मारण्याआधी रोहितने थोडा विचार करावा. हा उपयुक्त फटका असेलही मात्र हा एकमेव फटका नाही. 

रोहितकडे मारण्यासारखे बरेच फटके आहेत. ज्या गोलंदाजांकडे थोडा वेग आहे तो विचार करेल की माझ्या चेंडूवर एक- दोन षट्कार किंवा चौकार लागले तरी काही बिघडणार नाही. मात्र, एकवेळ अशीही येईल की फलंदाज चेंडू हवेत मारेल त्यावेळी मला त्याला बाद करण्याची संधी निश्चितपणे मिळेल.  नेमकी हिच बाब लक्षात घेत रोहितने फलंदाजीकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

रोहितला वाटत असेल की हा फटका मारण्यात मी यशस्वी होईल तर तो हा फटका मारू शकतो, मात्र सध्यातरी हा फटका मारताना तो चुकतो, असे लक्षात येत आहे. त्यामुळे  ८०, ९० किंवा शंभर धावांकडे वाटचाल करतेवेळी सध्यातरी हा फटका रोहितने कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला बरा.’  भारत- श्रीलंका यांच्यात आज, शनिवारपासून  सुरू होत असलेला सामना जिंकून रोहित क्लीन स्वीप करू इच्छितो. विजयासाठी स्वत: रोहितने मोठी खेळी करायलाच हवी. स्वत:च्या नेतृत्वाने त्याने चाहत्यांची मने जिंकली, आता सामा जिंकण्यासाठी त्याने स्वत:चा अधिकाधिक वेळ खेळपट्टीवर घालवायला हवा, असे गावसकर यांनी म्हटले आहे.n भारतीय कर्णधार रोहित शर्माचा हा ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना असेल.  तीनही प्रकारात रोहित ४०० सामने खेळणारा आठवा खेळाडू ठरेल.  n रोहितने आतापर्यंत २३० वन डे, १२५ टी-२० आणि ४४ कसोटी सामने खेळले आहेत. n सचिन तेंडुलकर (६६४), महेंद्रसिंग धोनी (५३५), राहुल द्रविड (५०५), विराट कोहली (४५७), मोहम्मद अझहरुद्दीन (४३३), सौरव गांगुली (४२१) आणि अनिल कुंबळे (४०१) हे चारशे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 

टॅग्स :रोहित शर्मा
Open in App