अहमदाबाद : पाच वेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सला मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रोहित शर्माला एक खास सल्ला दिला. ‘मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने काही दिवस आयपीएल मधून ब्रेक घ्यावा,’ असे ते म्हणाले.
‘मला मुंबईच्या फलंदाजी क्रमवारीत काही बदल पाहायला आवडतील. खरे सांगायचे तर, रोहितने यावेळी विश्रांती घ्यावी आणि डब्ल्यूटीसी फायनलसाठी स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे, असे मी सुचवेन. असे झाल्यास तो शानदार पुनरागमन करू शकतो. फलंदाजीत पुन्हा आम्हाला आधीचा रोहित शर्मा पाहण्याची इच्छा आहे. त्याने स्वतःला सावरले पाहिजे. सध्या तो मुंबईचा आणि टीम इंडियाचा कर्णधार असल्याने थोडा काळजीत दिसतो आहे. त्याने थोडे दडपण घेतले असावे,’ असे मत गावसकर यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, ‘कदाचित यावेळी रोहित डब्ल्यूटीसी फायनलबाबत विचार करीत असेल. माझ्या मते, त्याला विश्रांतीची गरज आहे. फायनलसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या दोन-तीन सामन्यांमध्ये खेळावे.’ यंदा आयपीएलमध्ये अर्ध्या प्रवासात रोहितची ना फलंदाजी दिसली ना नेतृत्वाची चुणूक जाणवली! गुजरातविरुद्ध रोहितचा ‘फ्लॉप शो’ पाहून गावसकर दुखावले गेले. मुंबईने सातपैकी तीन सामने जिंकले आहेत. रोहितच्या सात सामन्यांत एका अर्धशतकी खेळीसह केवळ १८१ धावा आहेत.
प्ले ऑफ गाठल्यास चमत्कार घडेलमुंबईने आतापर्यंत सातपैकी तीन सामने जिंकल्यामुळे हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. त्यामुळे एखादा चमत्कारच या संघाला प्ले ऑफ गाठून देऊ शकेल, असे मत गावसकर यांनी मांडले. ‘सध्या हा संघ ज्या पद्धतीने वाटचाल करीत आहे, ते पाहून चमत्कारच त्यांना प्ले ऑफ गाठून देऊ शकतो. फलंदाजी आणि गोलंदाजीत अप्रतिम कामगिरीद्वारे हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेऊ शकेल,’ असे लिटिल मास्टर यांनी म्हटले आहे.