नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ६ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या वन डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याचे वन डे संघात पुनरागमन झाले. दुसरीकडे २१ वर्षांचा युवा लेग स्पिनर कुलदीप बिश्नोई याला प्रथमच वन डे आणि टी-२० संघात स्थान देण्यात आले. दीपक हुड्डा याचीदेखील वन डे संघात वर्णी लागली.
जोधपूरचा युवा गोलंदाजीत रवी बिश्नोई याने १९ वर्षांखालील विश्वचषकात प्रभावी कामगिरी केल्याचे त्याला फळ मिळाले. त्याने सहा सामन्यात १७ गडी बाद केले होते. याशिवाय मागच्या दोन वर्षांत आयपीएलमध्ये पंजाब संघाकडून त्याने २३ सामन्यात २४ गडी बाद केले.
जडेजाचे पुनरागमन लांबले
विंडीजविरुद्ध मालिकेसाठी रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन होईल, अशी अपेक्षा होती, मात्र असे घडले नाही. जखमी झाल्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बाहेर राहिलेला जडेजा पूर्णपणे फिट नाही. तो फेब्रुवारीअखेर श्रीलंकेविरुद्ध आयोजित कसोटी मालिकेआधी संघात परतू शकतो.
बुमराह-शमी यांना विश्रांती
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली. लोकेश राहुल हा देखील वन डे मालिकेसाठी उपलब्ध राहणार नाही. फिरकीपटू अषर पटेल यालादेखील टी-२० मालिकेसाठी संघात स्थान मिळाले. ५० षटकांच्या सामन्यात मात्र तो खेळू शकणार नाही. भुवनेश्वर कुमार याचीदेखील केवळ टी-२० सामन्यांसाठी संघात निवड झाली.
विराट पुन्हा आरसीबीचा कर्णधार होणार?
बेंगळुरु : विराट कोहली पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (आरसीबी) कर्णधारपद स्वीकारताना दिसू शकतो. श्रेयस अय्यर किंवा ग्लेन मॅक्सवेल यांना आरसीबीचा कर्णधार बनविण्याची चर्चा होती. आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा विराटबाबत लक्ष्यवेधी विधान करताना म्हणाले, ‘कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामने जिंकले. आम्ही त्याला कर्णधारपदी ठेवण्यास प्राधान्य देऊ शकतो. आम्ही त्याला कर्णधारपद परत घेण्यासाठी विनंती करू.’ गेल्यावर्षी विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती.
मालिकेचे वेळापत्रक
६ फेब्रुवारी पहिला वन डे, ९ फेब्रुवारी दुसरा वन डे, ११ फेब्रुवारी तिसरा वन डे (सर्व सामने नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद). १६ फेब्रुवारी पहिला टी-२० सामना , १८ फेब्रुवारी दुसरा टी-२०, २० फेब्रुवारी तिसरा टी-२० सामना (सर्व सामने ईडन गार्डन, कोलकाता).
वन डे संघ : फलंदाज : रोहित शर्मा कर्णधार, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत.
अष्टपैलू : दीपक हुड्डा, शार्दूल ठाकूर, वॉलिंग्टन सुंदर.
फिरकीपटू : रवी बिश्नोई, युजवेंंद्र चहल, कुलदीप यादव.
वेगवान गोलंदाज : दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आवेश खान.
टी-२० संघ : फलंदाज : रोहित शर्मा कर्णधार, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत.
अष्टपैलू : अक्षर पटेल, व्यंकटेश अय्यर, वॉशिंग्टन सुंदर.
फिरकीपटू : रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल.
वेगवान गोलंदाज : मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, दीपक चाहर, शार्दूल ठाकूर.
Web Title: Rohit to lead against West Indies, Virat to captain RCB again?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.