नवी दिल्ली : अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याला चेतेश्वर पुजाराऐवजी पहिल्यांदा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार बनविण्यात आले आहे. नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर मायदेशी परतल्यामुळे अजिंक्य रहाणेकडे काळजीवाहू कर्णधारपद आले होते. रोहित फिट होऊन संघात दाखल झाल्यास त्याच्याकडे उपकर्णधारपद दिले जाईल, असा निर्णय संघ व्यवस्थापनाने आधीच घेतला होता. या निर्णयाशी संबंधित बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने स्वत:चे नाव गुप्त राखण्याच्या अटीवर सांगितले की, विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यने कर्णधारपदाची धुरा सांभाळताच उपकर्णधारपदाबाबत कुठलीही शंका नव्हती. रोहित या जबाबदारीसाठी योग्य होता. तो फिट होईपर्यंत पुजाराकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.
रोहित हा दीर्घकाळापासून मर्यादित षटकांच्या सामन्यात उपकर्णधार आहे. विराटच्या अनुपस्थितीत तो संघाच्या नेतृत्व समूहाचा भाग बनणार आहे.तो सिडनी कसोटीत शुभमान गिलसोबत सलामीला खेळेल की मधल्या फळीत फलंदाजीला येईल, हे स्पष्ट झालेले नाही. तो सलामीला आल्यास खराब फॉर्ममध्ये असलेला मयांक अग्रवाल याला बाहेर बसावे लागेल. रोहितने गुरुवारी सरावास सुरुवात केली. भारतीय संघ पाच जानेवारी रोजी सिडनीकडे रवाना होईल.