- अयाझ मेमन
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारताने सहज जिंकला. मोठ्या फरकाने जिंकलेला हा सामना अत्यंत सोपा होता असे नाही. कारण वेस्ट इंडिजने ३२३ धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. परंतु, कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांनी ज्या पद्धतीने खेळी केली त्यामुळेच हा सामना भारतासाठी सोपा झाला. हे दोेघे फॉर्ममध्ये असतात तेव्हा यांना रोखणे अशक्य असते. विराट कोहली सध्या आपल्या ‘गोल्डन’ वेळेत आहे. सर्व प्रकारात खेळणारा तो जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. तीन-चार वर्षांपासून त्याला रोखणारा गोलंदाज नाही. अशी फलंदाजी फार कमी वेळ पाहयाला मिळते. केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा त्याला प्रतिस्पर्धी ठरू शकतो. विराट आणि रोहित शर्मा यांच्यात द्विशतकी भागीदारी झाली. त्यामुळे या दोघांत नंबर वन कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.
माझ्या मते, विराट हा सर्व फॉर्मेटमध्ये नंबर वन खेळाडू आहे. पण, एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा त्याला टक्कर देण्यास समर्थ आहे. त्यामुळेच या दोघांमध्ये पहिल्या स्थानासाठी ‘जंग’ छेडली जात आहे. या दोघांवर भारतीय फलंदाजीची बरीच भिस्त अवलंबून आहे. ज्या पद्धतीने या दोघांनी फलंदाजी केली त्यावरून वेस्ट इंडिजसाठी मालिकेचे चित्र बिघडवू शकते. या दोघांना रोखण्यासाठी काय करावे, याच विचारात विंडीज गोलंदाज असतील. अंबाती रायुडू आणि धोनी यांच्यावरही नजर असेल. वृषभ पंंतने एकदिवसीय मालिकेत पदार्पण केले. मात्र, त्याने एक झेल सोडला. त्याला आगामी विश्वचषकात खेळायचे असेल तर असे झेल सोडून चालणार नाही.
पत्रकार परिषदेत विराटने आपण किती वर्षे खेळणार याबाबत म्हटले. १९ वर्षांपासून तो खेळत आहे. ११ वर्षे खेळून झालेली आहेत. परंतु, तो स्वत:ला खूप तंदुरुस्त ठेवत आहे. आहार, तंदुरुस्ती आणि व्यायाम यावर तो खूप भर देत आहे. त्यावरून तो आणखी दहा वर्षे खेळणार असे दिसते. चार-पाच वर्षे जरी खेळला तरी तो खूप काही विक्रम मोडीत काढणार. परंतु, आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी एक मर्यादित वेळ असते याची कल्पना त्याला आहे.
खेळाडूंना दोषी ठरविणे अयोग्य
बुकीकडून जी छायाचित्र व्हायरल होतात त्याला मी महत्त्व देत नाही. कारण बरेचदा पार्टीत किंवा इतर ठिकाणी चाहते क्रिकेटपटूंसह फोटो काढतात. चाहता कोण आहे याची कल्पना खेळाडूला नसते. त्यामुळे खेळाडूंना दोषी ठरवणे योग्य नाही. मला खरी समस्या वाटते ती अल जजीरा चॅनेलच्या बातमीची. कारण हे चॅनेल खूप दिवसांपासून क्रिकेटवर संशोधन करीत आहे. पाक फिरकीपटू दानिश कनेरियाने कॅमेऱ्यापुढे सांगितले की त्यांने स्पॉटफिक्सिंग केले. चॅनेलने दावाही केला की, त्यांच्याजवळ असे बरेच ‘आॅन कॅमेरा’ पुरावे आहेत. ज्यात आॅस्ट्रेलियन व इंग्लंड क्रिकेटपटूंचा समावेश आहे. इंग्लंड व आॅस्ट्रेलियन बार्डने त्यांच्याकडे फुटेज मागितले. मात्र, ते द्यायला तयार नाहीत. अल जजीराने फुटेज शेअर करायला हवेत.
(संपादकीय सल्लागार)
Web Title: Rohit-Virat battle for number one
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.