अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा खराब फॉर्म आयपीएल १५ चा निराशादायी पैलू ठरला. देशाचे दोन सर्वोत्कृष्ट फलंदाज. दोघांचा क्लास आणि आकडेवारी पाहता दोघांचाही संघर्ष वाईट ठरतो. वारंवार अपयशी ठरत असल्याने दोघांच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली, शिवाय भारतीय संघ व्यवस्थापनातही चिंतेचे वातावरण आहे.
आतापर्यंत ७ सामन्यांत कोहलीने ११९, तर रोहितने ११४ धावा केल्या. दोघांनी एकही अर्धशतक ठोकलेले नाही. त्यांच्या लौकिकाला ही कामगिरी न शोभणारी आहे. दरवर्षी आयपीएलमध्ये धावा काढणाऱ्या दहाजणांत या दोघांचा क्रमांक वरचा असायचा. यंदा मात्र अर्धी लीग आटोपलीे तेव्हा कोहली ३७, तर रोहित ३९ व्या स्थानावर आहे. रोहितच्या कामगिरीअभावी मुंबईच्या सहाव्या जेतेपदाच्या आशादेखील संपुष्टात आल्या. वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे सहज आणि आनंदाने धावांचा पाऊस पाडणारा जगातील आघाडीचा फलंदाज अशी रोहितची ख्याती. स्ट्रोक्सचा साठा आणि स्वइच्छेनुसार चेंडू फटकाविण्याची उत्तम क्षमता. याच बळावर गेल्या काही वर्षांत रोहितची ओळख जगातील सर्वांत धोकादायक फलंदाज अशी बनली.
आरसीबीचा कर्णधार म्हणून कोहलीची प्रदीर्घ आयपीएल कारकीर्द बेधडक ठरली. तथापि, त्याच्या अपयशामागे जो तर्क दिला जातो ते खरे वाटत नाही. कोहली अजूनही लीगमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू बनू शकतो. २०१६ च्या सत्रात त्याची विक्रमी चार शतके धडाकेबाजपणाची पावती ठरतात. स्वत:च्या आक्रमक शैलीत धावांची भूक वाढविण्यास विराट सक्षम वाटतो. धावा काढण्यातील सातत्य आणि स्पर्धात्मकवृत्ती या बळावर मागील एका दशकात जगातील कोणत्याही फलंदाजाच्या तुलनेत त्याने बाजी मारली. त्या तुलनेत यंदा मात्र तो स्वत:च्याच छायेत दबलेला जाणवतो.
गेल्या काही वर्षांत कोहलीला फारशी चांगली वागणूक मिळाली नाही. त्याच्या धावांचा वेग मंदावला. दोन वर्षांपासून ७० आंतरराष्ट्रीय शतकांवर थांबला. आधीसारखी प्रभावी खेळी पाहायला मिळत नाही. कोहलीने शतक झळकाविलेले नाही असे सर्व प्रकारात आता शंभर डाव उलटले ही बाब चिंताजनक ठरते. यंदा टी-२० विश्वचषकाचे आयोजन होईल. त्यादृष्टीने निवडकर्ते आयपीएलवर नजर रोखून आहेत. निवडीत रोहित आणि कोहलीकडे दुर्लक्ष केले जाण्याची शक्यता नाही; पण दोघांनीही फॉर्ममध्ये येत धावा काढायला सुरुवात केली तर निवडकर्तेदेखील आनंदाने दोघांची नावे पुढे करू शकणार आहेत.