ब्रिस्बेन - भारतीय क्रिकेट संघाने टी-२० वर्ल्डकपसाठी कंबर कसली आहे. टीम इंडियातील खेळाडू नेट्स प्रॅक्टिसमध्ये घाम गाळत आहेत. यादरम्यान, भारतीय संघाच्या सरावाचा एक खास व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक ११ वर्षांचा गोलंदाज भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. एवढंच नाही तर रोहित शर्माने त्याला टीम इंडियाकडून खेळणार का? असेही विचारले.
भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी ब्रिस्बेन येथे दाखल झाला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने पर्थ येथे सराव केला. तिथे भारतीय संघ सराव करत असताना एक ११ वर्षीय मुलगा गोलंदाजी करत होता. त्याची गोलंदाजी पाहून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही भारावला. या मुलाचं नाव द्रुशील चौहान आहे. त्याला गोलंदाजी करताना पाहून रोहितने त्याला ड्रेसिंग रूममध्ये बोलावले. तसेच त्याची भेट घेतली.
आता बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये द्रुशील चौहान हा डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करताना दिसत आहे. तसेच त्याला इनस्विंग यॉर्कर आणि आऊटस्विंगर टाकायला आवडते. रोहित शर्माने द्रुशीलला नेट्समध्ये गोलंदाजी करण्याचीही संधी दिली. तसेच त्याला स्वाक्षरी सुद्धा दिली. यावेळी रोहितने त्याला विचारले की, पर्थला राहिलास तर भारतासाठी कसा खेळणार? त्यावर द्रुशीलने सांगितले की, मी भारतात येईन, मात्र कधी येईन ते माहित नाही.
टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघातील हा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने पर्थमध्ये दोन सराव सामने खेळले होते. त्यातील एका सामन्यात भारताचा विजय झाला होता. तर एक सामना पराभूत व्हावे लागले होते.