मँचेस्टर : फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक वर्षांपासून असलेले दोन प्रमुख विक्रम मोडण्याची संधी आहे.रोहितने आतापर्यंत ८ सामन्यांत ९२.४२ च्या सरासरीने ६४७ धावा केल्या आहेत. त्याला एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा सचिनचा विक्रम मोडण्यासाठी केवळ २७ धावांची गरज आहे. सचिनने दक्षिण आफ्रिकेत २००३ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ११ सामन्यांत ६१.१८ च्या सरासरीने ६७३ धावा केल्या होत्या. तेव्हापासून एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम सचिनच्या नावावर कायम आहे. सचिनने त्यावेळी आपल्या पूर्वीच्या विक्रमात सुधारणा केली होती. त्याने १९९६ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत सात सामन्यात ५२३ धावा केल्या होत्या.
आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन वेस्ट इंडिजमध्ये २००७ ला झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सचिनचा विक्रम मोडण्याच्या समीप पोहचला होता, पण अखेर त्याला ६५९ धावांवर समाधान मानावे लागले होते.रोहितने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत पाच शतके झळकावली असून हाही एक विक्रम आहे. रोहित आता विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतक नोंदवण्याचा सचिनचा विक्रम मोडण्याच्या स्थितीत आहे.
रोहित जर शतक झळकावण्यात यशस्वी ठरला, तर त्याचे हे विश्वचषक स्पर्धेतील सातवे शतक ठरेल. रोहितने विश्वचषक २०१५ मध्ये एक शतक झळकावले होते. सचिनने विश्वचषकात ४५ सामने खेळताना ६ शतक व १५ अर्धशतक झळकावले आहेत.रोहितला सचिनच्या विश्वचषक स्पर्धेतील २,२७८ धावांच्या विक्रमापर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागेल, पण २३ वी धाव घेतल्यानंतर विश्वचषक स्पर्धेत त्याच्या एक हजार धावा पूर्ण होतील.