- ग्रॅमी स्मिथ लिहितात...
क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये त्याच फॉर्मेटचा वापर करण्यात येत आहे, ज्या फॉर्मेटचा शेवटचा वापर १९९२ मध्ये करण्यात आला होता. योगायोगाने इंग्लंड संघ त्यावेळी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. १९९९ नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेचे आयोजन इंग्लंडमध्ये होत आहे. यजमान संघाला यावेळी मजबूत दावेदार मानले जात आहे. इयोन मॉर्गनमुळे संघात झालेला फरक अनन्यसाधारण आहे. मी त्याच्या नेतृत्वशैलीमुळे प्रभावित आहो. सुरुवातीपासून तो आपल्या खेळाडूंना नैसर्गिक खेळ करण्याची मुभा देतो. त्यामुळे खेळाडूही कुठलेही दडपण न बाळगता आपला नैसर्गिक खेळ करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
२०१५ च्या विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर त्यांची आतापर्यंतची कामगिरी शानदार ठरली. माझ्या मते त्यात मॉर्गनच्या नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरली. संघाची फलंदाजी तळापर्यंत आहे. त्यांच्या संघात मोईन अली व आदिल राशिदच्या रूपाने दोन शानदार फिरकीपटू आहे. जोफ्रा आर्चरच्या समावेशामुळे संघात वेगवान गोलंदाजी आक्रमणात भेदकता आली आहे.
फलंदाजीत विशेष खेळाडूंचा समावेश असलेला इंग्लंड एकमेव संघ नाही. पण, माझ्या मते खरी लढत गोलंदाजांदरम्यान असेल. जे गोलंदाज सुरुवातीला बळी घेतील आणि मधल्या षटकांमध्ये प्रभावशाली ठरतील, त्यांच्यावर सर्वांची नजर राहील. जर मी कर्णधार असतो तर येथील पाटा खेळपट्ट्या बघता मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंच्या पर्यायाला पसंती दिली असती. सराव सामने बघितल्यानंतर ज्या संघांकडे चांगले फिरकीपटू नाही त्यांना यंदाच्या विश्वकप स्पर्धेत अडचणींना सामोरे जावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. लेग स्पिनरने वर्चस्व गाजवले नाही अशी एकही विश्वचषक स्पर्धा माझ्या स्मरणात नाही. त्यामुळे यावेळी इम्रान ताहिर, राशिद खान आणि युझवेंद्र चहल आपापल्या संघांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, हे निश्चित.
जेतेपदाच्या दावेदारांचा विचार करता इंग्लंड, भारत आणि आॅस्ट्रेलिया या संघांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पण, माझ्या मते दक्षिण आफ्रिका संघ ‘छुपा रुस्तम’ ठरू शकतो. इम्रान ताहिर व कागिसो रबाडा यांच्या रूपाने त्यांच्याकडे दोन असे गोलंदाज आहेत की, त्यांच्याविरुद्ध तोडगा शोधण्यात आयपीएलमध्ये कुणालाच यश आले नाही. माझ्यासाठी सर्वांत चिंतेची बाब म्हणजे संघाची फलंदाजी आहे, पण फॉर्मात असलेले फलंदाज त्याची उणीव भरून काढू शकतात. अशा स्थितीत फाफ ड्यूप्लेसिस व क्विंटन डिकॉक यांचा फॉर्म महत्त्वाचा ठरेल.
Web Title: The role of spinners will be important
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.