Ind Vs Pakistan । नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने होते. चुरशीच्या या लढतीत अखेर भारतीय संघाने विजय मिळवून टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने नाबाद 35 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी हा सामना अविस्मरणीय होता. कारण किंग कोहली एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे, ज्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सामन्यांचे शतक ठोकले आहे.
रॉस टेलरने ट्विटरच्या माध्यमातून कोहलीचे अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले, "विराट कोहली, भारतासाठी 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळल्याबद्दल तुझे अभिनंदन. क्लबमध्ये तुझे स्वागत आहे. मला तुला पुढील वर्षांत आणखी सामन्यांमध्ये खेळताना पाहायचे आहे." आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये 100 सामने खेळणारा रॉस टेलर पहिला खेळाडू आहे, तर विराट कोहलीने या यादीतील दुसरे स्थान पटकावले आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर रॉस टेलरने आपल्या कारकिर्दीत 112 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 102 टी-20 सामने खेळले आहेत.
विशेष म्हणजे प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सर्वबाद 147 धावा केल्या होत्या. यादरम्यान सलामीवीर मोहम्मद रिझवानने पाकिस्तानकडून सर्वाधिक 43 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ५ बळी आणि 2 चेंडू राखून सामना जिंकला. कोहलीने 34 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. तर पांड्याने अवघ्या 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. त्याच्या खेळीत ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. आता भारतीय संघाचा पुढील सामना 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँगविरुद्ध होणार आहे.