नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या संघाचा माजी खेळाडू रॉस टेलरने गुरूवारी त्याच्या बायोपिकमधून एक धक्कादायक खुलासा केला आहे. रॉस टेलरने (Ross Taylor) न्यूझीलंड क्रिकेटमध्ये वर्णद्वेष होत असल्याचा दावा केला आहे. 'रॉस टेलर ब्लॅक अँड व्हाईट' नावाच्या त्याच्या बायोपिकमध्ये टेलरने म्हटले आहे की, न्यूझीलंडमध्ये क्रिकेट हा स्वच्छ भावनेने खेळला जाणारा खेळ होता, मात्र त्याला तिथे वर्णद्वेष होत असल्याचा अनुभव आला. कारण ड्रेसिंग रूममध्ये टेलरला 'बंटर' म्हणून संबोधले जात होते.
रॉस टेलरचा गंभीर आरोप
दरम्यान, रॉस टेलरला न्यूझीलंडच्या क्रिकेट संघातील खेळाडू वेगवेगळ्या नावांनी हाक मारायचे. "न्यूझीलंडमध्ये क्रिकेटला एक चांगला खेळ मानले जाते. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मी एक वेगळा खेळाडू राहिलो आहे. संपूर्ण संघात मी एकटाच होतो ज्या खेळाडूचा चेहरा भोऱ्या रंगाचा होता. त्याची वेगळी काही आव्हाने होती, कारण माझे सहकारी आणि लोक माझ्याशी वेगळ्या पद्धतीने व्यवहार करत होते", असा खळबळजनक आरोप टेलरने केला.
रॉस टेलरने क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्याचे लक्ष या सर्व गोष्टींकडे गेले. न्यूझीलंडमधील हेराल्डमध्ये प्रकाशित झालेल्या बायोपिकमधील एका उताऱ्यात त्याने लिहले की, पॉलिनेशियन समुदायाचे खेळात प्रतिनिधित्व खूप कमी आहे. यात आश्चर्य होण्यासारखे काही नाही कारण कधीकधी मी माओरी किंवा भारतीय असल्याचे लोकांना वाटायचे.
रॉस टेलर न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार देखील राहिला आहे. टेलरने एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ११२ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि १०२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. न्यूझीलंडच्या संघाचा एक विश्वासू फलंदाज म्हणून टेलरची ओळख होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १८ शतके झळकावली आहेत.
Web Title: Ross Taylor has accused racism on New Zealand cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.