Join us  

'दुकान बंद, पुढची शिलाई तिरुअनंतपुरममध्ये', विरेंद्र सेहवागच्या 'दर्जी' टोमण्याला रॉस टेलरचे प्रत्युत्तर

रॉस टेलरचे अभिनंदन करताना सेहवागने ट्विटरवर त्याचा उल्लेख दर्जी(शिंपी) असा केला होता. 'वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली', असं मजेशीर ट्विट करत सेहवागने टेलरचे कौतुक केले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 1:46 PM

Open in App

मुंबई - सध्या सुरु असलेल्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघात रॉस टेलरचाही समावेश आहे. मात्र त्याला सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत - न्यूझीलंड 1-1 ने बरोबरीवर आहे. राजकोटमध्ये खेळण्यात आलेल्या दुस-या सामन्यात कॉलिन मुन्रोच्या तुफानी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. सामना न खेळणा-या रॉस टेलरने मात्र सामना संपल्यानंतर इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. 'राजकोट सामन्यानंतर दुकान बंद. पुढची शिलाई तिरुअनंतपुरममध्ये होईल. नक्की या', अशी कॅप्शनही रॉस टेलरने दिली आहे.  दोन्ही खेळाडूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'टेलर' नावावरुन शब्दयुद्ध सुरु आहे. विरेंद्र सेहवागनेच याची सुरुवात केली होती. 

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात रॉस टेलरने चांगली कामगिरी केली होती. यानंतर रॉस टेलरचे अभिनंदन करताना सेहवागने ट्विटरवर त्याचा उल्लेख दर्जी(शिंपी) असा केला होता. 'वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली', असं मजेशीर ट्विट करत सेहवागने टेलरचे कौतुक केले होते. 

 

यानंतर रॉस टेलरनेही सेहवागला चक्क हिंदीत रिप्लाय दिला होता. 'भाई, अगली बार अपना ऑर्डर टाईम पे भेज देना, तो मै आपको अगली दिवाली के पहले डिलिव्हर करुंगा.. हॅप्पी दिवाली', असं ट्विट टेलरने केले होते. 

यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमकच सुरु झाली होती. 'हाहाहा, मास्तरजी, इस साल वाली पतलून एक बिलांग छोटी करके देना नेक्स्ट दिवाली पे. रॉस द बॉस, मोस्ट स्पोर्टिंग', असा डायलॉग मारत सेहवागने पुन्हा एकदा रॉस टेलरचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तुमच्या टेलरने या दिवाळीत चांगले कपडे शिवले नाहीत का, असे ट्विट करून रॉसने सेहवागला प्रत्युत्तर दिले होते. 

यानंतरही सेहवाग काही थांबायचा नाव घेत नव्हता. रॉस टेलरच्या विनोदबुद्धीचं कौतुक करत 'कपडे शिवायचा प्रश्न असो की भागीदारी रचण्याचा, तुमच्या इतक्या उच्च दर्जाच्या शिवणकामाची स्पर्धा कोणीच करु शकत नाही', सेहवागने म्हटले होते. यानंतर आता रॉस टेलरने एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत रॉस टेलर एका दुकानाबाहेर बसला असून 'राजकोट सामन्यानंतर दुकान बंद. पुढची शिलाई तिरुअनंतपुरममध्ये होईल. नक्की या' असं लिहिलं आहे. विरेंद्र सेहवागनेही रॉस टेलरच्या हिंदीचं कौतुक करत तुला आधार कार्ड द्यायला हरकत नसल्याचं म्हटलं आहे. 

 

टॅग्स :विरेंद्र सेहवागरॉस टेलरक्रिकेट