हॅमिल्टन : रॉस टेलरच्या विक्रमी १७ व्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दुस-या क्रिकेट कसोटी सामन्यात सोमवारी तिस-या दिवशी विंडीजपुढे ४४४ धावांचे आव्हान ठेवले आणि पाहुण्या संघाच्या दोन फलंदाजांना माघारी परतवत मालिकेत क्लीन स्वीपच्या दिशेने वाटचाल केली. तिस-या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची २ बाद ३० अशी स्थिती आहे.
आजचा दिवस न्यूझीलंडच्या नावावर राहिला. न्यूझीलंडने विंडीजचा पहिला डाव २२१ धावांत गुंडाळल्यानंतर १५२ धावांची आघाडी घेतली आणि त्यानंतर टेलरच्या नाबाद १०७ धावांच्या खेळीच्या जोरावर दुसरा डाव ८ बाद २९१ धावांवर घोषित करीत विंडीजपुढे ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले.
न्यूझीलंडने त्यानंतर दुसºया डावात किरण पॉवेल (००) व शिमरोन हेटमायेर (१५) यांना तंबूचा मार्ग दाखवीत विंडीजला अडचणीत आणले. आजचा खेळ थांबला त्या वेळी सलामीवीर फलंदाज व कर्णधार क्रेग ब्रेथवेट (१३) व शाई होप (१) खेळपट्टीवर होते. विजयासाठी विंडीजला ४१४ धावा व न्यूझीलंडला ८ बळींची गरज आहे.
न्यूझीलंडतर्फे कर्णधार केन विल्यम्सननेही ५४ धावांची खेळी केली. विंडीजतर्फे मिगुएल कमिन्सने ६९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर शेनन गॅब्रियल व रोस्टन चेस यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याआधी, सकाळच्या सत्रात ८ बाद २१५ धावसंख्येवरून पुढे खेळताना विंडीजने केवळ ६ धावांची भर घालत उर्वरित दोन विकेट गमावल्या.
ट्रेंट बोल्टने (४-७३) व कमिन्स (१५) आणि गॅब्रियल (०) यांना क्लीन बोल्ड केले. टीम साऊदी, नील वेगनर व कोलिन डिग्रँडहोम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. (वृत्तसंस्था)
- टेलरने शतकी खेळीदरम्यान न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक १७ शतके ठोकण्याचा दिवंगत माजी कर्णधार मार्टिन क्रो व विद्यमान कर्णधार केन विल्यम्सन यांच्या विक्रमाची बरोबरी साधली. टेलर या खेळीदरम्यान दोनदा सुदैवी ठरला. त्याने रेमन रिफरच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत १९८ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.
Web Title: Ross Taylor's record-breaking century helped New Zealand put 444 in front of the West Indies
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.