मुंबई : आयपीएलमध्ये यंदा विविध स्थानांवर खेळणारा दिल्लीचा फलंदाज रोवमॅन पॉवेल याने कर्णधार ऋषभ पंत याच्याकडे पाचव्या स्थानावर फलंदाजीला पाठवून विश्वास दाखविण्याची विनंती केली होती. गुरुवारी सनरायजर्सविरुद्ध दिल्लीच्या विजयात त्याने आवडत्या पाचव्या स्थानावर दिमाखदार खेळी करीत, दिलेला शब्द खरा केला.
पॉवेलने ३५ चेंडूत नाबाद ६७ आणि डेव्हिड वॉर्नरने नाबाद ९२ धावा ठोकल्या. दोघांमध्ये झालेल्या शतकी भागीदारीमुळे दिल्लीचा २१ धावांनी विजय झाला. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना पॉवेल म्हणाला, ‘मी ऋषभला म्हणालो होतो की, पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी माझ्यावर विश्वास ठेव. सुरुवात करताना १५-२० चेंडू समजून घेतल्यानंतर संपूर्ण फटकेबाजीचा माझा प्रयत्न असतो. आयपीएलला आधीपासून मी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यासाठी कठोर सराव केला होता.’
२८ वर्षांच्या पॉवेलने आयपीएलमध्ये सुरुवातीला सहाव्या स्थानावर फलंदाजी केली. त्यानंतर दोन सामन्यात पाचव्या स्थानावर खेळला, मात्र नंतर पुन्हा त्याला सहाव्या स्थानावर पाठविण्यात आले. एका सामन्यात आठव्या स्थानावर पाठविण्यात आले, त्यावेळी तो निराश होता.
पॉवेल म्हणाला, ‘सुरुवात माझ्यासाठी निराशादायी होती, मात्र स्वत:वर विश्वास कायम होता. ऋषभसोबत चर्चा करीत आठव्या स्थानावर पाठविल्याने निराश झाल्याचे लक्षात आणून दिले. अखेरच्या षटकात मी उत्तुंग फटकेबाजी केल्यामुळे वॉर्नरला शतक साजरे करण्याची संधी मिळू शकली नाही. त्याआधी मी वॉर्नरसोबत बोललो. तू शतक पूर्ण करू इच्छित असशील, तर मी एक धाव घेतो, असे सांगितले होते. त्यावर वॉर्नरने मला सल्ला दिला की, क्रिकेटमध्ये असे काहीही नसते. मोठे फटके मारून धावा वाढवायला हव्यात.’