नवी दिल्ली : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघाला आयपीएलच्या सुरूवातीलाच दुखापतीचे ग्रहण लागले आहे. आरसीबीचा आघाडीचा फलंदाज रजत पाटीदार आणि रीस टॉपली दुखापतीमुळे चालू हंगामातून बाहेर झाले आहेत. खरं तर रीस टॉपलीच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेन पार्नेलला संधी मिळाली आहे, तर रजत पाटीदारच्या जागी वैशाक विजय कुमारला संघात स्थान मिळाले आहे.
दरम्यान, रीस टॉपलीला मुंबई इंडियन्सविरूद्धच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. खांद्याला झालेली दुखापत गंभीर असल्याने तो आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून बाहेर झाला आहे. तर रजत पाटीदार दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात देखील खेळला नव्हता. दक्षिण आफ्रिकेसाठी ५६ ट्वेंटी-२० सामने खेळणाऱ्या वेन पार्नेलकडे आयपीएलचा अनुभव आहे, त्याने या स्पर्धेत २६ सामने खेळले असून २६ बळी घेतले आहेत. आरसीबीने ७५ लाख रूपये देऊन त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे.
तर रजत पाटीदारच्या रिप्लेसमेंटबद्दल भाष्य करायचे झाले तर, वैशात विजय कुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकच्या संघाकडून खेळतो. त्याने आतापर्यंत १४ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये २२ बळी घेतले आहेत. आरसीबीने या खेळाडूला २० लाखांच्या मूळ किंमतीत खरेदी केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"