Join us  

"आता आमचे पुढचे लक्ष्य एकच...", विराट कोहली भावुक; निष्ठावंत चाहत्यांचे मानले आभार

Virat Kohli Tweet Viral : आयपीएल २०२३ मधून बाहेर झाल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांचे आभार मानले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:44 PM

Open in App

virat kohli emotional  | नवी दिल्ली : गुजरात टायटन्सविरूद्धच्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले. विराट कोहलीने शानदार शतकी खेळी करून घरच्या मैदानावर चाहत्यांना खुश केले पण शुबमन गिलच्या शतकाने आरसीबीच्या तोंडचा घास पळवला. आरसीबीच्या पराभवासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली. दोन शतके झळकावून देखील आपला संघ प्लेऑफमध्ये न गेल्याने आरसीबीचा सलामीवीर विराट कोहली भावुक झाला. विराटने एक पोस्ट करून निष्ठावंत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, गतविजेत्या गुजरात टायटन्सने आरसीबीच्या स्वप्नावर पाणी टाकले अन् विराट आर्मीला बाहेरचा रस्ता दाखवला. शुबमन गिलने १०४ धावांची शतकी खेळी करून विराटच्या शतकाचा देखील पराभव केला. खरं तर या सामन्यात गिल आणि विराट कोहली यांनी शतक झळकावून रंगत आणली. शतक झळकावूनही संघाला विजय साकारता न आल्याने विराटने एक भावनिक ट्विट केले.

विराटने चाहत्यांचे आभार मानताना म्हटले, "एक असा हंगाम ज्याचे काही क्षण अविस्मरनीय होते पण दुर्दैवाने आम्ही ध्येय गाठण्यात कमी पडलो. निराश झालो आहे पण पुढच्या हंमासाठी खंभीरपणाने उभे राहायला हवे. प्रत्येक टप्प्यावर आम्हाला साथ दिल्याबद्दल आमच्या समर्थकांचे खूप आभार. प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि माझ्या सहकाऱ्यांचे खूप खूप आभार. पुढच्या हंगामात शानदार पुनरागमन करणे हे आमचे पुढील लक्ष्य आहे."

विराटचे शतक 'व्यर्थ'गुजरातविरूद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 'करा किंवा मरा' असा होता. गतविजेत्यांना पराभूत करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान विराट आर्मीसमोर होते. पण गुजरातने आपला विजयरथ कायम ठेवून आरसीबीला बाहेरचा रस्ता दाखवला अन् मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. आरसीबीने दिलेल्या १९९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने १०४ धावांची नाबाद शतकी खेळी करून गुजरातला विजय मिळवून दिला. एकूणच विराटच्या शतकावर गिलचे शतक 'भारी' पडल्याचे दिसले.

 

 

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२३
Open in App