बेंगळुरू : कागिसो रबाडाच्या भेदक माऱ्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने रविवारी येथे यजमान रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा ४ गडी राखून पराभव केला. आरसीबी संघाचा यंदाच्या मोसमातील हा सलग सहावा पराभव ठरला. संघाला अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. आयपीएलच्या इतिहासात सलग सहा सामने गमावत सुरुवात करणारा आरसीबी पहिला संघ नाही. दिल्ली डेअरडेव्हिल्स (आत्ताचा दिल्ली कॅपिटल्स) संघानेही २०१३ मध्ये आपले सुरुवातीचे सहा सामने गमाविले होते.
आरसीबीने दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाने अय्यरच्या (६७) खेळीच्या जोरावर १८.५ षटकांत ६ बाद १५२ धावांची मजल मारत विजय साकारला. अय्यरने ५० चेंडूंना सामोरे जाताना २ षटकार व ८ चौकार लगावले. त्याआधी, आरसीबी संघाचा डाव रबाडाच्या (४/२१) अचूक माऱ्यापुढे ८ बाद १४९ धावांत रोखला गेला. संघातर्फे कर्णधार विराट कोहली (४१) व मोईन अली (३२) यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या निकालासह दिल्ली संघाने सहा सामन्यात तीन विजय मिळवत सहा गुणांची कमाई केली. दिल्ली संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी कायम असून आरसीबी संघ अखेरच्या स्थानी आहे. एबी डिव्हिलियर्स (१७) स्वस्तात बाद झाल्याने कोहलीने संघाचा डाव सावरला खरा, मात्र त्याला अपेक्षित वेगवान खेळी करता आली नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या षटकात शिखर धवन (0) माघारी परतला. त्याला टीम साऊदीने बाद केले. साऊदीच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अय्यरही नशिबवान ठरला. त्याचा झेल यष्टिरक्षक पार्थिव पटेलला टिपता आला नाही. सलामीवीर पृथ्वी शॉने साऊदीच्या पुढच्या षटकात पहिल्या चार चेंडूवर चौकार ठोकले, तर पाचव्या चेंडूवर लेगबायचा चौकार मिळवला. अय्यरने चहलच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला अर्धशतक गाठून दिले. पृथ्वी २२ चेंडूंमध्ये २८ धावा केल्यानंतर फिरकीपटू नेगीचा बळी ठरला. कॉलिन इनग्रामला (२२) मोईन अलीने बाद केले.
दिल्ली संघाला अखेरच्या पाच षटकांत विजयासाठी २७ धावांची गरज होती. दिल्ली संघाला विजयासाठी ५ धावांची गरज असताना सैनीने(२-२४) अय्यर व क्रिस मॉरिस (०) यांना बाद केले तर मोहम्मज सिराजने (१-१४) पंतला (१८) तंबूचा मार्ग दाखविला. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्यांना पत्कराव्या लागलेल्या पराभवाची आठवण झाली. अक्षर पटेलने (४) सिराजच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : २० षटकात ८ बाद १४९ धावा (विराट कोहली ४१, मोईन अली ३२; रबाडा ४/२१, मॉरिस २/२८) पराभूत वि.दिल्ली कॅपिटल्स : १८.५ षटकात ६ बाद १५२ धावा (श्रेयस अय्यर ६७, पृथ्वी शॉ २८, कॉलिन इनग्राम २२; नवदीप सैनी २/२४)