दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील ३०वा सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सनं ( RR) सुरुवात तर दणक्यात केली, परंतु त्यांना DCच्या तगड्या फलंदाजांनी चोपून काढले. २ बाद १० अशा अवस्थेत असलेल्या दिल्लीसाठी शिखऱ धवन आणि श्रेयस अय्यर यांनी धाव घेतली आणि राजस्थान समोर तगडे आव्हान उभे करून दिले. बेन स्टोक्स अन् जोस बटलर यांनी RRसाठी दमदार कामगिरी केली. रॉबीन उथप्पाच्या चुकीच्या कॉलचा RRला फटका बसला. पण, पुन्हा एकदा राहुल टेवाटिया संकटमोचक ठरेल असे वाटले होते. मात्र, दिल्लीनं त्याला रोखून धरलं. या विजयासह दिल्ली ( १२ गुण) पुन्हा टॉपवर गेले.
दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, जोफ्रा आर्चरनं दिल्लीला अवघ्या १० धावांवर दोन धक्के दिले. पृथ्वी शॉ ( ०) पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला, तर रहाणे ( २) तिसऱ्या षटकात रॉबीन उथप्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरला. धवननं ३३ चेडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा चोपल्या. अय्यरने ४३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकांसह ५३ धावा केल्या. दोन सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि अॅलेक्स कैरी यांनी दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. स्टॉयनिस १८ धावांवर माघारी परतला. RRकडून आर्चरनं ४ षटकांत १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं ७ बाद १६१ धावा केल्या.
बेन स्टोक्स आणि जोस बटरल यांनी RRला दणदणीत सुरुवात करून दिली. त्यांना नशीबानंही सुरुवातीला साथ दिली. बेन स्टोक्सला रन आऊट करण्याची संधी अजिंक्य रहाणेनं गमावली. तिसऱ्या षटकात अॅनरीच नॉर्ट्झेच्या गोलंदाजीवर एक षटकार व दोन खणखणीत षटकार मारून बटलरनं DCचे धाबे दणाणून सोडले. पण, नॉर्ट्झेनं त्याच षटकात त्याचा त्रिफळा उडवला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ ( १) आर अश्विनच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला. RRनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ बाद ५० धावा केल्या.
पदार्पणवीर तुषार देशपांडेनं DCला मोठी विकेट मिळवून दिली. त्यानं बेन स्टोक्सचा अडथळा दूर केला. ३५ चेंडूंत ६ चौकारांसह ४१ धावांत माघारी परतला. अक्षर पटेलनं RRला मोठा धक्का दिला. संजू सॅमसन ( २५) नंतर आलेल्या रियान परागलाही पटेलनं बाद केले. रॉबीन उथप्पानं त्याला धाव घेण्यासाठी कॉल दिला, पण खेळपट्टीच्या मधोमध येताच त्याला माघारी जाण्यास सांगितले. पटेलनं अचून निशाणा साधताना त्याला धावबाद केले. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर नॉर्ट्झेनं राहुल टेवाटियाचा सोपा झेल सोडला. १८व्या षटकार उथप्पा ३२ धावांवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. जोफ्रा आर्चरलाही ( १) कागिसो रबाडानं माघारी पाठवले. रबाडानं १९व्या षटकात एक विकेट अन् तीन धावा दिल्या. तुषार देशपांडेनं अखेरच्या षटकात टिच्चून मारा करताना दिल्लीचा विजय पक्का केला. राजस्थानला ८ बाद १४८ धावांवर समाधान मानावे लागले.
Web Title: RR vs DC Latest News : Delhi Capitals beat Rajasthan Royals by 13 runs, go on Top in IPL 2020 Point Table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.