Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्या खच्चून आत्मविश्वास भरलेल्या दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) कडून राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांची यथेच्छ धुलाई होईल, असेच वाटले होते. पण, स्टीव्हन स्मिथच्या ( Steven Smith) आक्रमक नेतृत्त्वानं DCच्या धावाला लगाम लावली. पण, स्मिथवर DCचा कर्णधार श्रेयस अय्यर भारी ठरला. गोलंदाजांचा योग्य वापर अन् सुरेख क्षेत्ररक्षण लावून DCनं राजस्थानच्या फलंदाजांना चक्रव्यूहात अडकवले. दिल्लीनं हा सामना जिंकून गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले. कागिसो रबाडा, आर अश्विन, मार्कस स्टॉयनिस यांची यांच्या अचूक मऱ्याला शिमरोन हेटमायरच्या चपळ क्षेत्ररक्षणाची साथ लाभली.
शारजाहच्या खेळपट्टीचा अधिक अभ्यास असलेल्या राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) तीन विकेट्स घेत दिल्लीला मोठे धक्के दिले. श्रेयस अय्यर ( 22) आणि रिषभ पंत ( 5) धावबाद झाले. चांगल्या फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ ( 19) यालाही आर्चरनं बाद केले. मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) 39 आणि शिमरोन हेटमायर ( Shimron Hetmyer) 45 धावांची खेळी केली. अक्षर पटेलनं ( 17) छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी करून दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. दिल्लीला 8 बाद 184 धावा करता आल्या. जोफ्रा आर्चरनं 24 धावांत 3 विकेट्स घेतल्या.
जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) पॉवर प्लेमध्ये दोन धक्के दिल्यानंतर DCचा डाव अडखळला. यशस्वी जैस्वालनं ( Yashasvi Jaiswal) भन्नाट क्षेत्ररक्षण करताना दिल्लीच्या कर्णधाराला मागे पाठवले. शिमरोन हेटमारयनं दिल्लीला मोठ्या धावसंख्येची आस लावली, परंतु कार्तिक त्यागी-राहुल टेवाटिया या जोडीनं त्या मावळून टाकल्या. शारजाह स्टेडियमवर सहज वाटणाऱ्या दोनशे धावांचा पल्लाही दिल्ली कॅपिटल्सला गाठता आला नाही.
प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा (RR) सलामीवीर जोस बटलर ( 15) तिसऱ्याच षटकात माघारी परतला. कर्णधार स्टीव्ह स्मिथचा सुरेख झेल टिपून शिमरोन हेटमायरनं DCला मोठं यश मिळवून दिलं. स्मिथ 24 धावांवर बाद झाला. आपल्या फेव्हरिट ग्राऊंडवर संजू सॅमसन फटकेबाजी करेल, असेच वाटले होते. पण, त्याच्या अपयशाचा पाढा येथेही कायम राहिला. तो अवघ्या 5 धावा करून स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. हेटमायरनं घेतलेला झेल हा कॅच ऑफ दी मॅच ठरला. खेळपट्टीवर टीकून राहणाऱ्या यशस्वी जैस्वालला DC गोलंदाज स्टॉयनिसनं त्रिफळाचीत केले. राजस्थानचा निम्मा संघ 82 धावांत तंबूत परतला. त्यानंतर राजस्थानचा डाव सावरलाच नाही. दिल्लीनं सामना जिंकून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. दिल्लीनं हा सामना 46 धावांनी जिंकला. राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) 31 धावा करत झुंज दिली. राजस्थानचा संपुर्ण संघ 138 धावांत माघारी परतला.