Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर खोऱ्याने धावा करणे सोपं नाही, हे राजस्थान रॉयल्सच्या इनिंग्जमधून समोर आले. मागील सामन्यात ६८ धावांत शतक कुटणारा जोस बटलरही येथे संघर्ष करताना दिसला. पण, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RR vs RCB) गोलंदाजांचा शेवटपर्यंत सामना केला. देवदत्त पडिक्कल व शिमरोन हेटमायर यांची त्याला साजेशी साथ मिळाली. बटलर, पडिक्कल व हेटमायर या तिघांनाही RCBच्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडून एकेक जीवदान दिले आणि ते महागात पडले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल ( ४) दुसऱ्याच षटकात त्रिफळाचीत झाला. डेव्हिड विलीने ही विकेट मिळवून दिल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सामन्यावर पकड घेता आली असती. पण, त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी जोस बटलर व देवदत्त पडिक्कल यांचे सोपे झेल सोडले. या जोडीने मग ४९ चेंडूंत ७० धावांची भागीदारीकरून राजस्थानला सावरले. हर्षल पटेलने ही जोडी तोडली. १०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पडिक्कलने मारलेला चेंडू हवेत उंच झेपावला आणि विराटने सुरेखरित्या तो टिपला. देवदत्त २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून माघारी परतला.
बटलर एका बाजूने खिंड लढवत होता. त्याने आयपीएलमध्ये १०० षटकार मारण्याचा विक्रम या सामन्यात पूर्ण केला. आयपीएलमध्ये १००+ षटकार खेचणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये त्याने स्थान पटकावले. ख्रिस गेल ३५७ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( २५१), किरॉन पोलार्ड ( २१५), डेव्हिड वॉर्नर ( २०१), शेन वॉटसन ( १९०), आंद्रे रसेल ( १५४), ब्रेंडन मॅक्यूलम ( १३०), ड्वेन स्मिथ ( ११७), ग्लेन मॅक्सवेल ( ११२) व फॅफ ड्यू प्लेसिस ( १०३) यांचा क्रमांक येतो. कर्णधार संजू सॅमसन ( ८) वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण, त्यानंतर आलेल्या हेटमायरने सलामीवीर बटलरला चांगली साथ दिली. १९व्या षटकात मोहम्मद सिराजला दोन सलग षटकार खेचून बटलरने अर्धशतक पूर्ण केले.
बटलर व हेटमायर या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. आकाश दीपला २०वे षटक दिले आणि बटलरने त्याला दोन सलग खणखणीत षटकार खेचले. आयपीएल २०२२मध्ये २०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. बटलर व हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा कुटल्या. बटलर ४७ चेंडूंत ६ षटकारांसह ७०,तर हेटमायर ३१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर नाबाद राहिला. राजस्थान रॉयल्सने ३ बाद १६९ धावा केल्या.