Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : चांगली सुरुवात करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बॅकफूटवर फेकले गेलेले पाहायला मिळत आहेत. फॅफ ड्यू प्लेसिस व अनुज रावत यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या, परंतु पुढील ३२ धावांत राजस्थान रॉयल्सने पाच विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal ) एका षटकाने सामना फिरवला अन् विराट कोहली ( Virat Kohli) व डेव्हिड विली यांना सलग चेडूंवर माघारी परतावे लागले. यामुळे RCBचा महिला फॅन्स वर्ग कोमात गेला असला तरी युझीची पत्नी धनश्री जोमात दिसली. तिचं सेलिब्रेशन व्हायरल झालं.
जोस बटलर आणि शिमरोन हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा चोपून सामन्याचे चित्र बदलले. देवदत्त पडिक्कल, बटलर व हेटमायर यांनी खेळपट्टीवर जम बसवून नंतर फटकेबाजी केली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १७० धावांचे लक्ष्य उभं करण्यात यश मिळवले. यशस्वी जैस्वाल ( ४) आणि कर्णधार संजू सॅमसन ( ८) हे वगळल्यास राजस्थानच्या तीनही फलंदाजांनी सुरेख खेळ केला. बटलर व पडिक्कल या जोडीने मग ४९ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. देवदत्त २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून माघारी परतला. बटलर व हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा कुटल्या. बटलर ४७ चेंडूंत ६ षटकारांसह ७०,तर हेटमायर ३१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर नाबाद राहिला. राजस्थान रॉयल्सने ३ बाद १६९ धावा केल्या.
आयपीएलमध्ये एका डावात एकही चौकार न मारून दमदार खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये बटलरने स्थान पटकावले. नितीश राणाने २०१७मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध ७ , संजू सॅमसनने २०१७मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध ७ व राहुल टेवतियाने २०२०मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध ७ षटकार खेचले होते. डेव्हिड वॉर्नर, आंद्रे रसेल यांनीही त्यांच्या खेळीत एकही चौकार न खेचता ६ षटकारांची आतषबाजी केली होती. बटलरने आज त्यांच्याशी बरोबरी केली. पण, पुरुषांच्या ट्वेंटी-२० सामन्यांत एका डावात एकही चौकार न मारून केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. याआधी एल्टन चिगुमबुराने झिम्बाब्वेच्या स्थानिक स्पर्धेत २०१०मध्ये ६५ धावा केल्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना फॅफ ड्यू प्लेसिस व अनुज रावत यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करून दमदार सुरूवात केली. पण, ७व्या षटकात युझवेंद्र चहलने RCBला पहिला धक्का दिला आणि फॅफ २९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर नवदीप सैनीने पुढील षटकात अनुज रावतला ( २६) बाद केले. विराट कोहली व डेव्हिड विली यांच्या खांद्यावर मदार होती, परंतु दोघांमध्ये ताळमेळ चुकला. विराटला ( ५) रन आऊट होऊन माघारी जावे लागले. अगदी काही इंचाच्या फरकामुळे विराटला बाद दिले गेले. पुढील चेंडूवर युझवेंद्रने विलीचा त्रिफळा उडवला आणि RCBची अवस्था बिनबाद ५५ वरून ४ बाद ६२ अशी झाली.