RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आणखी एका पर्वात जेतेपदाच्या चषकापासून दूर रहावे लागणार आहे. स्टार फलंदाजांचे अपयश, गचाळ क्षेत्ररक्षण अन् टुकार गोलंदाजीने RCB चा घात केला. RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! RR ने हा सामना जिंकून क्वालिफायर २ मध्ये स्थान पक्के केले आणि त्यांना सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार आहे. हा सामना शुक्रवारी चेपॉकवर होणार आहे.
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
RR च्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल व टॉम कोह्लेर-कॅडमोर ( २०) यांनी ४६ धावा जोडल्या. यशस्वीने ३० चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. कर्ण शर्माने कर्णधार संजू सॅमसनला १७ धावांवर यष्टिचीत केले. RR ने १० षटकांत ८६ धावांवर ३ फलंदाज गमावले होते. १४व्या षटकात विराट कोहलीच्या भन्नाट थ्रोवर ध्रुव जुरेलला ( ८ ) रन आऊट होऊन माघारी जावे लागले. RR ला ३६ चेंडूंत ५८ धावा करायच्या होत्या आणि त्यांच्या हातात सहा विकेट्स होत्या.
रियान पराग व शिमरोन हेटमायर यांनी १५ व्या षटकात ११ धावा मिळवल्या, त्यानंतर रियानने १६व्या षटकात कॅमेरून ग्रीनची धुलाई करून १७ धावा मिळवल्या. २४ चेंडूंत ३० धावा असा सामना या दोघांनी खेचून आणला. १७ चेंडूंत १६ धावा हव्या असताना रियान परागचा त्रिफळा मोहम्मद सिराजने उडवला. पराग २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३६ धावा करून परतला. शेवटच्या चेंडूवर फॅफ ड्यू प्लेसिसने अविश्वसनीय झेल घेऊन १४ चेंडूंत २६ धावा करणाऱ्या हेटमायरला माघारी पाठवले.
१२ चेंडूंत १३ धावा RR ला करायच्या होत्या आणि रोव्हमन पॉवेल व आर अश्विन ही जोडी मैदानावर उभी होती. फर्ग्युसनच्या पहिल्या दोन चेंडूवर पॉवेलने चौकार खेचले आणि सहाव्या चेंडूवर षटकार खेचून सामना जिंकला. राजस्थानने १९ षटकांत ६ बाद १७४ धावा केल्या आणि ४ विकेट्सने विजय मिळवला. पॉवेल ८ चेंडूंवर १६ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, विराट कोहली ( ३३), कॅमेरून ग्रीन ( २७), रजत पाटीदार ( ३४) व महिपाल लोम्रोर ( ३२) यांनी संघाला ८ बाद १७२ धावांचा सन्मानजनक पल्ला गाठून दिला. ट्रेंट बोल्टने पहिल्या स्पेलमध्ये ( ३-०-६-१) RCB वर दडपण निर्माण केले. आर अश्विनने ( २-१९) सलग दोन विकेट्स घेऊन RR ला मोठे यश मिळवून दिले. युझवेंद्र चहलने धोकादायक विराटची महत्त्वाची विकेट घेतली. आवेश खानने ३ विकेट्स घेऊन RCB चे कंबरडे मोडले.
Web Title: RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : There is no 'E Sala Cup Namde' for Royal Challengers Bengaluru this year either! Virat Kohli dreams shattered by Rajasthan Royals, RR face SRH in Qualifier 2
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.