आज आयपीएलचा एलिमिनेटर सामना आहे. या सामन्यात जिंकणारी टीम शुक्रवारी क्लालिफायर २ मध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सामना होत आहे. या सामन्यात कोण जिंकेल याची भविष्यवाणी माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी केली आहे.
राजस्थान रॉयल्सने चार सामने हरले आहेत. तर एक सामना पावसात वाहून गेला आहे. तर आरसीबीने सलग सहा सामने जिंकले आहेत. राजस्थानने २००८ मध्ये आयपीएल जिंकली आहे. हा संघ काही आठवड्यांपूर्वी सर्वात पसंतीचा संघ होता, हा संघ लयीमध्ये असला तर त्याचा रोखणे अशक्य असते. परंतु गेल्या चार सामन्यांत फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये कमतरता समोर आली होती. त्यातच जोस बटलर मायदेशी परतल्याने त्यांची बॉलिंगची धार कमी झालेली असणार आहे.
याच्या उलट आरसीबीची परिस्थिती तगडी असल्याचे सुनिल गावस्कर म्हणाले आहेत. आजचा सामना एकतर्फी होण्याची शक्यता गावस्कर यांनी व्यक्त केली आगे. डु प्लेसिस, विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू उर्वरितांना प्रोत्साहित करतात. कमी काळात ते त्यांच्यावर लढण्यासाठी प्रभाव टाकू शकतात. त्याच्या उलट राजस्थानचे आहे. त्यांनी आधीच चार-पाच मॅच गमावल्या आहेत. त्यांनी शेवटची मॅचही खेळलेली नाही. ते गेल्या ११ दिवसांपासून खेळलेले नाहीत. यामुळे हा सामना एकतर्फी होईल याची मला भीती वाटत आहे. आरसीबी आरआरवर प्रबळ ठरेल असे नाही झाले तर मला आश्चर्य वाटेल, असे गावस्कर म्हणाले आहेत.
कालच्या सामन्यात काय झाले...गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या फायनलमध्ये प्रवेश केला. २०१४ नंतर पुन्हा एकदा त्यांना जेतेपद पटकावण्याची संधी मिळाली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात KKR ने सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. २०२१ नंतर KKR फायनल खेळणार आहेत. हैदराबादला आता RR vs RCB यांच्यातल्या विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर २ मध्ये खेळून फायनलमध्ये धडक देण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेले SRH ची फलंदाजी आज KKR समोर अपयशी ठरली. मिचेल स्टार्कने पहिल्या स्पेलमध्ये ३ विकेट्स घेऊन हैदराबादला बॅकफूटवर फेकले. ट्रॅव्हिस हेड सलग दुसऱ्या सामन्यात भोपळ्यावर परतला.
श्रेयस अय्यर व वेंकटेश अय्यर यांनी KKR चा डाव सावरला. वेंकटेशने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ श्रेयसने ३ खणखणीत षटकार खेचून २३ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि १३.४ षटकांत संघाचा विजयही पक्का केला. कोलकातनने २ बाद १६४ धावा करून बाजी मारली. श्रेयस २४ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेशनेही २८ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ९७ धावा झोडल्या.