RR vs RCB, IPL 2024 Eliminator: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा एलिमिनेटर सामना होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी RCB ने सराव सत्र रद्द केल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे चार दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एलिमिनेटर लढतीवर हल्ल्याचं सावट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही वृत्तपत्रांनी विराट कोहलीच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आणि त्यामुळेच RCB चे सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द केल्याचे सांगण्यात आले.
काल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर १ सामना पार पडला. याही सामन्यापूर्वी दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली गेली होती. पण, सामना सुरळीत पार पडला. यामुळे RCB व RR यांना सामन्यानंतरच स्टेडियमवर सराव करण्याची संधी मिळाली. दोन्ही संघांना अहमदाबादच्या युनिव्हर्सिटी ग्राऊंडवर सराव करण्याचा पर्याय दिला गेला होता. त्यानुसार RR ने सायंकाळी ४ ते ६ या कालावधीत सराव केला, परंतु RCB ने त्यांचे सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय कोणतंही कारण न देता घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार RCB च्या या निर्णयामागे दहशतवादी हल्ल्याच्या संशयाचा कोणताही संबंध नाही. त्या चार दहशतवाद्यांना अटक होण्यापूर्वीच हा निर्णय घेतला गेला होता.
“आरसीबीने आम्हाला कोणत्याही दहशतवादी धोक्याबद्दल सांगितले नाही. संशयितांना अटक करण्यापूर्वी त्यांनी सराव सत्र रद्द केले. आम्ही RR आणि RCB दोन्हीसाठी विद्यापीठाच्या मैदानावर व्यवस्था केली आणि RR ला संध्याकाळच्या वेळेत प्रशिक्षण दिले. अहमदाबादमध्ये काल संध्याकाळी झालेल्या सामन्याला बरेच प्रेक्षक उपस्थित होते आणि घाबरण्याचे कारण नाही,” असे गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
जोपर्यंत सामन्याच्या पूर्वसंध्येला काहीही शेड्यूल केलेले नव्हते कारण, इथे IPL च्या क्वालिफायर १ चे आयोजन केले गेले होते. KKR विरुद्ध SRH या सामन्यापूर्वीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) माहिती दिली की दोन्ही संघ प्रवास करत असल्यामुळे कोणताही सराव किंवा सामनापूर्व पत्रकार परिषद होणार नाही.
यंदा RCB ला IPL विजेतेपद मिळवण्याची सर्वोत्तम संधी - विजय मल्ल्या
एलिमिनेटरमध्ये कोणता संघ जिंकणार हे अहमदाबादमध्ये ठरणार आहे. त्याआधी प्रत्येकजण आपापल्या परीने दावे करत आहे. असाच दावा विजय मल्ल्याने केला आहे. 2008 मध्ये विजय मल्ल्याने ही फ्रेंचायझी विकत घेतली होती. त्याबद्दल आज त्याने ट्विट केले. "जेव्हा मी RCB संघसाठी आणि विराट कोहली साठी बोली लावत होतो त्यावेळी माझा आतला आवाज मला सांगत होता की यापेक्षा जास्त चांगला पर्याय असूच शकत नाहीत. आज देखील माझा आंतरात्मा मला सांगतोय की यंदा RCB ला IPL विजेतेपद मिळवण्याची सर्वोत्तम संधी आहे. ऑल द बेस्ट!" असे ट्विट मल्ल्याने केले.