कोलकाता : कोणी आवड म्हणून क्रिकेटपटू बनतो, तर कोणाला परिस्थिती मैदानापर्यंत खेचून आणते. अशीच कथा आहे पापू राय या गोलंदाजाची... दोन वेळेच्या अन्नासाठी त्याने क्रिकेट खेळायला सुरूवात केली आणि त्याची देवधर चषक स्पर्धेसाठीच्या भारत 'C' संघात निवड झाली आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत 'C' संघात 23 वर्षीय पापू खेळणार आहे. कोलकाताच्या या खेळाडूचा इथवरचा प्रवास मनाला चटका लावणारा आहे. लहानपणीच पापूच्या डोक्यावरील आई वडीलांचे छत्र हरपले. विजय हजारे चषक स्पर्धेत ओडिशा संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने उल्लेखनीय खेळ केला. याच जोरावर त्याला देवधर चषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. पापू म्हणाला,'' लोकं मला गोलंदाजी केली तर जेवण देण्याचे आश्वासन द्यायचे आणि मला प्रत्येक विकेटसाठी 10 रुपये मिळायचे.''
पापूचे आई वडील बिहारचे होते आणि नोकरीसाठी ते बंगालमध्ये आले. पापू लहान असताना वडिलांना हृदय विकाराच्या झटक्याने आणि आईला प्रदीर्घ आजारामुळे प्राण गमवावे लागले होते. देवधर चषक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर पापू रात्रभर रडत बसला होता. काका-काकीने पापूचा सांभाळ केला, परंतु काकांच्या निधनानंतर 15 व्या वर्षी पापूवर घराची जबाबदारी आली.
सुरूवातीला तो जलदगती गोलंदाजी करायचा, परंतु हावडा क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक सुजीत साहा यांनी त्याला फिरकी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. 2011 मध्ये त्याने बंगाल क्रिकेट संघाच्या सेकंड डिव्हिजन लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. 2015 मध्ये त्याने ओडिशाच्या 15 वर्षांखालील संघात स्थान पटकावले. तीन वर्षांत त्याने वरिष्ठ संघात स्थान मिळवले.