इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे एकूण ब्रँड व्हॅल्यू २०२३ हंगामानंतर तब्बल २८ % वाढून १०.७ अब्ज डॉलर म्हणजेच ८९,२३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ब्रँड व्हॅल्यूएशन कन्सल्टन्सी ब्रँड फायनान्सने एका अहवालात असे म्हटले आहे. २००८ मध्ये आयपीएलला सुरुवात झाल्यापासून ब्रँड मूल्य ४३३% वाढले आहे.
या वर्षीच्या ब्रँड व्हॅल्यूच्या वाढीसाठी स्टेडियममधील प्रचंड प्रेक्षक संख्या, इंटरनेट आणि इतर पद्धतींवर आयपीएल सामन्यांचा अधिक वापर आणि मेगा-मीडिया भागीदारी यांचे श्रेय देण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वाधिक मौल्यवान फ्रँचायझी ब्रँड आहे आणि त्यांचे मूल्य ८७ दशलक्ष डॉलर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्स ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत ८१ दशलक्ष डॉलरसह दुसऱ्या, तर कोलकाता नाइट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अनुक्रमे ७८.६ दशलक्ष डॉलर व ६९.८ दशलक्ष डॉलर ब्रँड व्हॅल्यूसह तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहे.
दोन वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने मागच्या वर्षीच्या आठव्या स्थानावरून यंदा पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांची ब्रँड व्हॅल्यू ३८ टक्क्यांनी वाढली आहे. राजस्थान रॉयल्स व RCB हे ब्रँड व्हॅल्यूमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. ब्रँड फायनान्सच्या मते, महिला प्रीमियर लीग (WPL) मुळे संघांच्या संबंधित ब्रँड मूल्यांना चालना मिळाली. अहवालात म्हटले आहे की, "५२ सामन्यांचे दिवस, इम्पॅक्ट प्लेअर नियम आणि DRS यासह लक्षणीय बदलांमुळे आयपीएल २०२३ आणखी हिट ठरला. " त्यात मुकेश अंबानी यांच्या मालकिच्या जिओ सिनेमाने १५ भाषांमध्ये आयपीएलचे मोफत प्रक्षेपण दाखवले.