मंगळवारी झालेली अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया मॅच जबरदस्त झाली. ९६ वर ७ विकेट गेलेले असतानाही ऑस्ट्रेलियाने 'एक हाती' २९२ रन्सचे लक्ष्य पार केले. एक फलंदाज टेस्ट क्रिकेट आणि दुसरा टी ट्वेंटीच खेळत होता. या दोघांनी जवळजवळ जिंकलेल्या अफगाणिस्तानला पराभवाचे पाणी पाजले. परंतू, अनेकांना राहून राहून द्विशतक झळकविणाऱ्या मॅक्सवेलने रनर का नाही घेतला असाच प्रश्न पडला आहे.
रोज मॅच पाहणाऱ्यांना हे नवीन नसेल, परंतू जे कधीतरी मॅच पाहत आहेत, त्यांना हा प्रश्न जरूर पडला आहे. मॅक्सवेलच्या पायात क्रॅम्प आला तरी तो फक्त चौकार, षटकारावरच खेळत होता. त्याच्याच जोरावर त्याने २०१ धावा करत ऑस्ट्रेलियाला सेमीचे तिकीट दिले आहे.
मॅक्सवेलला नीट चालता येत नव्हते. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एक रन काढताना देखील कमिन्स खेळाडू नसतील तिथेच चेंडू फटकवायचा आणि मॅक्सवेल चालत, काहीसा पाय ओढत जायचा. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी अनेकदा मॅक्सवेल ज्या विकेटकडे धावत आहे तिथेच त्याला रनआऊट करण्याचा प्रयत्न केला. परंतू, सर्व फेल गेले.
एकदा तर मॅक्सवेल मैदानावर पडला. वेदनेने विव्हळत होता, फिजिओंनी देखील मैदानाक़डे धाव घेतली. आता मॅक्सवेल काही खेळू शकत नाही म्हणून पुढचा फलंदाज झंपा देखील पॅव्हेलिअनमधून खाली आला. परंतू, मॅक्सवेलने मैदानाबाहेर जाण्यास नकार दिला. एवढे दुखत असूनही मॅक्सवेलला रनर का मिळाला नाही? प्रत्येकाला वाटत होते त्याला रनर मिळायला हवा होता.
ICC कार्यकारी समितीने 2011 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये जखमी फलंदाजांसाठी धावपटू न देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय शिफारशींचा एक भाग होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की यामुळे खेळामध्ये खूप व्यत्यय येतो आणि वेळ वाया जातो. हा नियम फक्त आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी लागू आहे. स्थानिक क्रिकेट सामन्यांसाठी रनरचा नियम तसाच ठेवण्यात आला आहे. त्यावेळी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला होता.