नवी दिल्ली : भारताविरूध्दच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक रसेल डोमिंगो (Russell Domingo) यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) याबाबत माहिती दिली आहे. बांगलादेशच्या संघाने भारताविरूद्ध मायदेशात 0-2 ने कसोटी मालिका गमावली. या सामन्यानंतर डोमिंगो ख्रिसमसच्या सुट्टीसाठी दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या घरी रवाना झाले होते. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्रिकेट ऑपरेशनचे चेअरमन जलाल युनूस यांनी संघाला नव्या प्रशिक्षकाची गरज असल्याचे संकेत दिले होते.
दरम्यान, ढाका येथे झालेल्या कसोटी सामन्यानंतर युनूस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले होते, "आम्हाला अशा प्रशिक्षकाची गरज आहे ज्याचा संघावर प्रभाव असेल. तुम्हाला लवकरच संघात काही बदल दिसतील. आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला एक अतिशय मजबूत संघ हवा आहे जो अत्यंत स्पर्धात्मक संघ ठरू शकेल. आम्ही भारताला हरवण्याच्या जवळ गेलो होतो पण या संघाला पराभूत करणे कठीण आहे. या मैदानावर आम्ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. परंतु यावेळी भारताची बाजू मजबूत होती." तसेच सामन्यात प्रेरणा महत्त्वाची असते. आम्हाला केवळ एक चांगला प्रशिक्षक हवा नाही, तर तो एक मार्गदर्शक देखील असावा. कारण प्रशिक्षकाने खेळाडूंसोबत कामगिरीचा आढावा घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
बांगलादेशच्या प्रशिक्षकाची हकालपट्टी 2019च्या विश्वचषकानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ने स्टीव्ह रोड्स यांची हकालपट्टी केल्यानंतर काही महिन्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये डोमिंगो यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात ट्वेंटी-20 मालिका, न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच कसोटी, दक्षिण आफ्रिकेत वन डे मालिका जिंकली आणि भारताविरुद्ध मायदेशात वन डे मालिका जिंकली. लक्षणीय बाब म्हणजे बुधवारी ढाका येथे स्थानिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन म्हणाले, "बांगलादेश क्रिकेट बोर्ड नवीन वर्षात सेटअपमध्ये नवीन प्रशिक्षक आणण्याचा विचार करीत आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"