Australia A vs India A, 1st unofficial Test रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय 'अ' संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या सामन्यात भारतीय 'अ' संघाची सुरुवात खराब झाली आहे. ऑस्ट्रेलियातील मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ एरिनाच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात भारतीय 'अ' संघाचा पहिला डाव अवघ्या १०७ धावांत आटोपला आहे.
ऋतुराज गायकवाडवर गोल्डन डकची नामुष्की
ऑस्ट्रेलिया 'अ' संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad ) या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या डावातील दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर भारतीय 'अ' संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यावर गोल्डन डकची नामुष्की ओढावली. तो पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला.
रोहितच्या जागेवर प्रबळ दावेदारी ठोकणारा भिडूही स्वस्तात फिरला माघारी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी बॅकअप ओपनरच्या रुपात अभिमन्यू ईश्वरन याला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा काही सामन्याला मुकला तर तो भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करेल,अशी चर्चा रंगत आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याची सुरुवातही निराशजनक झालीये. ऋतुराज गायकवाड पाठोपाठ तो अवघ्या ७ धावा करून तंबूत परतला. याशिवाय नितीश रेड्डीच्या पदरीही भोपळा आल्याचे पाहायला मिळाले.
ईशान किशनचाही फ्लॉप शो
भारतीय संघातील स्टार बॅटर ईशान किशन भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी धडपडताना दिसतोय. भारतीय 'अ' संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला विकेट किपर बॅटरच्या रुपात संघात स्थान मिळाले आहे. तोही लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. ११ चेंडूचा सामना करून तो अवघ्या ४ धावांवर माघारी फिरला.
फक्त तिघांनी गाठला दुहेरी आकडा
ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कल याने भारताकडून सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याच्याशिवाय साई सुदर्शन २१ धावा आणि नवदीप सैनीनं केलेल्या २३ धावा वगळता एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.